औरंगाबाद- आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. पैसे कमावणे हा शिक्षणामागील उद्देश नाही, तर सर्वांगीण विकास शिक्षणातून साधला जातो. आजच्या पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. सर्वांनीच यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.
जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आयुष्यात पुढे जाणे सहज होते, असे मत देवगिरी इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर यांनी व्यक्त केले. भारतीय समाज सेवा केंद्राच्या वतीने आयोजित दिवाळी शिबिरात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी आरोग्यवर्धक आचेचा वापर न करता पाककृती बनवणे, निसर्ग आणि व्यंगचित्र तसेच हस्तकलांचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले, तर दुस-या दिवशीच्या सांगता समारोहात योगगुरू डॉ. चारुलता रोजेकर, सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. शिऊरकर म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून
आपल्या सर्व दिशांचे सखोल ज्ञान प्राप्त होते. चांगल्या-वाईटाचा निर्णय घेण्याची दृष्टी मिळते. लहानपणीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, मीदेखील तुमच्याप्रमाणे सामान्य विद्यार्थी होतो. मात्र, आयुष्याची दिशा निश्चित केली, त्यावर जिद्दीने पुढे गेलो. काही प्रसंगी निराशा झाली, मार्ग दिसत नव्हता; मात्र आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. गरिबी आपली कमजोरी बनू न देता तिचा अस्त्र म्हणून वापर करा. आयुष्यात ज्या गोष्टी सहज उपलब्ध होतात, त्यांचे महत्त्व उरत नाही. त्याउलट कष्टाने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्त्व कोट्यवधीच्या घरात असते. त्यामुळे कष्टाने प्रत्येक गोष्ट पदरात पाडून घ्या आणि त्याचा आनंद उपभोगा. आदर करा, असेही त्यांनी सांगितले.
जिद्द कामी आली
योगतज्ज्ञ डॉ. चारुलता रोजेकर म्हणाल्या, मी तिसऱ्या वर्गात असताना एक अपघात घडला. त्यानंतर मी चालू आणि बसू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मी जिद्दीने उभी राहिले. आज योगा प्रशिक्षणामुळेच माझी समाजात ओळख निर्माण झाली. आयुष्यात जी गोष्ट आपल्याला खाली पाडते तीच आपल्याला सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अपयशात खचून जाऊ नका. निराशेतून बाहेर येण्यासाठी योग उत्तम औषध आहे.
हक्कांसाठी जागरूक राहा
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचा प्रत्येकाला समान हक्क आहे, असे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. बालकामगारविरोधी कायदा सरकारने बालकांच्या हितासाठी तयार केला आहे, अन्याय सहन करू नका, असा सल्ला सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी दिला. या सर्व सत्रांमध्ये मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांतील करिअरच्या संधी, मार्गातील अडथळे दूर करण्याचे तंत्र अशा अनेक बाबींवर संवाद साधला.