आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाईतील रस्ता बळकावून ड्रेनेजलाइन फोडल्याचा आरोप, नागरिक ठाण्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांधकामामुळे ड्रेनेजलाइन फुटून परिसरात सांडपाणी साचत आहे. - Divya Marathi
बांधकामामुळे ड्रेनेजलाइन फुटून परिसरात सांडपाणी साचत आहे.
औरंगाबाद - देवळाईपरिसरातील माउलीनगर भागात जमीन मालकाने सोसायटीच्या मोकळ्या जागेवर ताबा मिळवून सहा मीटरच्या रस्त्यावर बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केला. बांधकाम करताना रस्त्याच्या खालील ड्रेनेजलाइन फुटली असून मागील दहा दिवसांपासून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमीन मालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी परिसरातील नागरिकांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले.
नागरिकांच्या मते, गायत्री गृहनिर्माण सहकारी संस्था गट क्रमांक १०३ मध्ये बिल्डरने दिलेल्या नकाशामध्ये मोकळ्या जागेचा उल्लेख आहे. याच जागेवर आनंद विसपुते यांनी काही दिवसांपासून बांधकाम सुरू केले आहे. यात सोसायटीचा नियोजित रस्ता गिळंकृत केला आहे. बांधकामावेळी रस्त्याखालील ड्रेनेजलाइन फोडण्यात आली. परिणामी बांधकाम होत असलेल्या खड्ड्यामध्ये ड्रेनेजचे पाणी साचत आहे. त्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली. परिसरातील सूर्यकांत वाटोरे यांचे घर जवळच असल्याने त्यांचा मुलगा आजारी पडला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या खुल्या जागेच्या काही कागदपत्रांमध्ये संस्थेचे अध्यक्ष विसपुते यांनी बदल केला आहे. संपूर्ण बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. यासंदर्भात चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जमीन मालकाने कागदपत्रांमध्ये फेरफार करून खुली जागा बळकावली आहे. फोडलेल्या ड्रेनेजलाइनचे त्यांनी तत्काळ काम करून द्यावे बांधकाम तत्काळ थांबवण्याची मागणी राजेंद्र राठोड, राजेश जंगले, काकासाहेब काळे यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले.
काय आहे आरोप ?
सहा मीटर रस्त्याचा नकाशामध्ये उल्लेख; पण रस्त्यावरच बांधकाम सुरू
बांधकाम सुरू असलेली जमीन सोसायटीची जागा असताना येथे अनधिकृतपणे बांधकाम केले जात आहे
बांधकाम करताना ड्रेनेजलाइन फोडली
सोसायटीमध्ये एकूण ४८ घरे
आरोप चुकीचा
जमिनीचीमूळ कागदपत्रे आहेत. त्यामध्ये केवळ सव्वा मीटर रस्त्याचा उल्लेख आहे. जमीन खरेदी करणे, कागदपत्रे ही सर्व अधिकृत असून माझ्या जागेमधून अनधिकृतपणे ड्रेनेजलाइन सोडण्यात आलेली आहे. ड्रेनेजलाइनसंदर्भात बांधकाम सुरू करण्यापूर्वी सोसायटीला कळवले होते. सोसायटीचे नागरिक चुकीचा आरोप करत असून याविरोधात न्यायालयात बाजू मांडेन. -आनंद विसपुते, जमिनीचे मालक.