आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाडी रेल्वेस्थानक विकासाच्या मार्गावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाला डी दर्जा प्राप्त झाला आहे. दक्षिण मध्ये रेल्वे विभागाला यासंबंधी रेल्वे बोर्डाकडून पत्रही प्राप्त झाले आहे. त्यानुसार या स्थानकाचा विकास केला जाणार आहे. पंधरा दिवसांत टेंडर निश्चित होऊन प्रत्यक्ष विकासकामाला सुरुवात होईल. तसेच रेल्वे विभागाकडून तिकीट बुकिंगची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोळा वर्षांपूर्वी मुकुंदवाडी रेल्वेस्थानक अस्तित्वात आले. गारखेडा परिसर, सिडको, चिकलठाणा परिसरातील हजारो प्रवाशांची यामुळे सोय झाली. हजारो प्रवासी येथून नियमित ये-जा करत आहेत. त्यामध्ये विद्यार्थी, उद्योग, व्यापारी, पर्यटक, सरकारी नोकर आदी प्रवाशांचा समावेश आहे. दहा वर्षांत या परिसराचा विस्तार झाला असून लोकसंख्येतही वाढ झाली आहे. या स्थानकाचे उत्पन्न ६० लाखांवर पोहोचले आहे. याची दखल रेल्वे बोर्डाने घेतली असून स्थानकाला डी दर्जा देऊन विकास करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी खुर्च्या, कव्हरिंग शेड, पार्किंग व्यवस्था, ऑफिस, वेटिंग हॉल, सर्व प्रकारचे तिकीट बुकिंग विभाग, हाय लेव्हल प्लॅटफार्म, कँटीनसाठी १५ दिवसांत कामाच्या निविदा निघणार आहेत.

मनपा रस्ते विकास कधी करणार ?
मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाचा डी दर्जानुसार विकास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. पण रेल्वेस्थानकावर ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. अतिक्रमण काढून चार महिने उलटून गेली आहेत. मात्र, अद्याप रस्त्यातील विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर हटवले नाहीत. याकडे महापालिका प्रशासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.