आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी सुविधा अन् ग्रामीण समृद्धीचे पोखरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिमेंटचे रस्ते, हिरवीगार झाडी, स्वच्छ सुंदर घरे, शुद्ध पाणी...प्रत्येक चौकात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, टॅक्स भरणाऱ्यांना मोफत दळण... गावातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी ‘माहेरघर’ योजनेसारखी अभिनव कल्पना आणि मुलांसाठी अभ्यासिकेची सोय निर्माण करणारे पोखरी हे गाव म्हणजे जणू नंदनवनच. शहरापासून अवघ्या किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले हे छोटेसे खेडे. गावकरी एकत्र आले आणि त्यांनी हा कायापालट घडवून आणला. आदर्श गाव म्हणून आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या या गावाने निर्मल ग्राम योजनेचे पुरस्कारही मिळवले आहेत. शहरी सुविधा अन् गावाची सुपीकता येथे पाहायला मिळते. म्हणूनच ही यशोगाथा दखलपात्र...
‘एकच ध्यास गावचा विकास’ हा नारा आता देशभरात दिला जात आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो, प्रत्यक्षात मात्र गावचा विकास होतच नाही. पण औरंगाबादच्या पाटोदा या गावाने आदर्श घालून दिला. त्यापाठोपाठ पोखरी या गावानेही विकासाची वाट धरली. गावकऱ्यांनी ठरवले तर प्रत्येक खेडी स्वयंपूर्ण होऊ शकते हे दाखवून दिले. सामाजिक कर्तव्याची जाणीव आणि विकासाची ओढ येथील प्रत्येक गावकऱ्याला आहे.

शहरलाही लाजवणाऱ्या सुविधा
हडको आणि आंबेडकर चौकापासून किमी अंतरावर हे गाव आहे. डोंगराची महिरप लाभलेला हा निसर्गरम्य परिसर. लोकसंख्या फक्त १२९३. त्यात स्त्रियांची संख्या ६४१, तर पुरुषांची ६५२ इतकी. येत्या दीड वर्षात या गावाने संत तुकडोजी ग्रामस्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवले. ग्राम निर्मल योजना यशस्वीरीत्या राबवत अल्पावधीत शहरी वसाहतीला लाजवेल अशा सुविधा निर्माण केल्या. शाळा, अभ्यास आणि कारभार सर्वच बाबतीत गावाने नावलौकिक मिळवला आहे.

^माहेरघर ही योजना जरी असली तरी येथे आल्यानंतर आम्हाला हे आमचे हक्काचे घर वाटते. येथे गावातील सर्व महिलांची अतिशय आपुलकीने काळजी घेतली जाते. ललिताडोरले, सीमाहरणे, माहेरघरातील महिला

^आदर्श ग्राम पोखरीत ग्रामविकासाच्या योजना राबवताना कुठल्याच अडचणी आल्या नाहीत येणारही नाहीत. गावात सहकार्याची भावना आहे. शीतलउमप, गामसेविका,पोखरी

^विकास करत असताना प्रत्येक घटकाला समजून घेतले पाहिजे. विकासाच्या योजना राबवत असताना सर्वांच्या अडचणी सोडवून गाव स्वयंपूर्ण करण्याचा आमचा निर्धार त्यामुळेच प्रत्यक्षात आला. सुनीलहरणे, पंचायतसमिती सभापती, पोखरी

^सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावच्या विकास होत आहे. गावकऱ्यांनी साथ दिली नसती तर हे शक्यच नव्हे. हे श्रेय सर्व गावकऱ्यांचे आहे. रुणकाकडे, सरपंच,पोखरी

शुद्ध पाणी, चकाचक रस्ते
पिण्याचे शुद्ध पाणी, गावातील प्रत्येक रस्ता चकाचक सिमेंटचा. पेव्हर ब्लॉक आणि सुसज्ज ग्रामसंसदेची इमारत येथे पाहायला मिळते. गावातले साधे मंदिर पाहिले तरी अर्धा शीण हलका होतो.

अंगणवाडी अन् अभ्यासिका
गावात जिल्हा परिषदेची स्वच्छ सुंदर शाळा, सुसज्ज अंगणवाडी आणि जोडीलाच मुलांसाठी अभ्यासिकाही गावकऱ्यांनी उभारली आहे. ज्येष्ठ ग्रामस्थांसाठी सहल यात्रेचे मोफत आयोजन करून त्यांची काळजी घेतली जाते. एवढेच नव्हे तर विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवाही वोक्हार्ट फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गावातील महिलांसाठी अभिनव ‘माहेरघर’
गावकऱ्यांनी महिलांसाठी अभिनव अशी माहेरघर योजना राबवली आहे. ग्रामभवनाच्या लगत असलेल्या अंगणवाडीत ते चालवले जाते. आदर्श अंगणवाडी पुरस्कार कार्यकर्त्या रुख्मिणीबाई साळवे या दुपारी गर्भवती महिलांसाठी नि:स्वार्थ भावनेने काम करतात. या माहेरघरात चार अद्ययावत बेड आहेत. पंखा, टीव्हीची सोय असून प्रत्येक भिंतीवर नवजात बालकांची हसरी चित्रे लावण्यात आली आहेत. सुंदर म्हणींनी भिंती रंगवलेल्या आहेत. प्रसन्न वातावरणात माहेरघरातील गर्भवती महिलांशी सुसंवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले जाते. वैद्यकीय उपचारही केले जातात. गर्भवती महिलांची सर्व काळजी येथे घेतली जाते.

^ग्रामीण भागातील महिलांमध्ये माहितीचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. गर्भावस्थेत तर याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. सुसंवादाने त्यांना मार्गदर्शन करतो . रुख्मिणीबाईसाळवे, अंगणवाडी कार्यकर्त्या