आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis News In Marathi, BJP, Congress, Divya Marathi

काँग्रेसकडे बेरोजगारीचा अँटमबॉम्ब, देवेंद्र फडणवीस यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - देशावर सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता असून या काळात काँग्रेसने बेरोजगारी कमी करण्याऐवजी बेरोजगारीचा अँटमबॉम्ब तयार केला आहे. या निवडणुकीत तो फुटून काँग्रेसला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला. फुलंब्री येथे महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.


प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, शिवाजीराव पाथ्रीकर, जनार्दन शेजवळ, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोटम, आसाराम तळेकर, बापू घडामोडे यांची यावेळी उपस्थित होती. ते म्हणाले, या देशात 10 वर्षापासून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार आहे. मात्र, सर्वात दुर्बल पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे. राज्यातील शेतकरी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळी, बेकारी, महागाई, शेतकर्‍यांची आत्महत्या, महिलांवर अत्याचार यामुळे पुरता बकाल झाला आहे. मात्र, हे सरकार काहीच करत नाही. शेतकरी हा कर्जात जन्मतो आणि कर्जात राहतो व कर्जातच मरतो. याचे सरकारला काहीच सोयरसुतक नाही. आज शेतीमालाचे भाव न वाढण्यास काँग्रेस आघाडीचे सरकार जबाबदार आहे. शेतकर्‍याकडील माल संपल्यानंतर हे सरकार तिप्पट किमतीने मालाची निर्यात करत आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होत आहे. जेव्हा काँग्रेसचे सरकार आले त्या वेळी महागाईचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त होता. मात्र, विरोधकांचे सरकार आल्यावर हा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला. त्यामुळे काँग्रेस व महागाईचा जवळचा संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.


कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा व 3 थ्री जी घोटाळ्यात करोडे रुपयांचा भ्रष्टाचार सरकारने केला आहे. राज्यात 70 हजार कोटी रुपये सिंचनासाठी खर्च केले आहे. मात्र, एक टक्कासुद्धा सिंचन झाले नसून हा सर्व पैसा नेत्याच्या घरात गेल्याचा आरोप त्यांनी केला. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सहा वर्षात 6 कोटी 70 लाख बेरोजगारांना नोकर्‍या दिल्या, तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या काळात केवळ 27 लाख बेरोजगारांना नोकर्‍या दिल्या आहेत. असेही ते म्हणाले. तसेच भाजपत चांगले लोक येत असून रावसाहेब दानवेंना लोकसभेत पाठवा असेही आवाहन केले.
या वेळी माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, माजी सभापती शिवाजीराव पाथ्रीकर, जनार्दन शेजवळ, सहकारी बँकेचे सदस्य शिवाजी गाडेकर, बाबूराव साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद वाघ व आभार प्रदर्शन सांडू जाधव यांनी केले.