आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis News In Marathi, BJP, Sharad Pawar, Divya Marathi

सर्वेक्षणामुळे पवार निराश, देवेंद्र फडणवीस यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत मानसिकतेतून वक्तव्ये करीत आहेत. इंटेलिजन्स ब्युरो व विविध सर्वेक्षणांच्या अहवालांमुळे त्यांना निराशेच्या गर्तेत ढकलून दिले आहे. त्यातून नरेंद्र मोदींबद्दल दर्जाहीन व बेताल वक्तव्य केले जात आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (12 एप्रिल) चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली.


फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचे अशोभनीय वक्तव्य पहिल्यांदाच देशाच्या राजकारणात ज्येष्ठ नेत्यांकडून केले जात आहे. विदर्भात महायुती दहा जागा जिंकेल, असा दावा करून ते म्हणाले, नागपूर लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये 43 टक्के मतदान झाले होते. यंदा यात वाढ होऊन 59 टक्के इतके मतदान झाल्याने तेथून नितीन गडकरी यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.


गोटेंचा नोटा निष्फळ ठरेल
आमदार अनिल गोटे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंबंधी चर्चा झाली होती. परंतु काही समीकरणे जुळत नसल्याने त्यांना अपरिहार्य कारणास्तव उमेदवारी देता आली नाही. गोटेंची मागील दहा वर्षातील काँग्रेसविरोधी भूमिका लक्षात घेता त्यांचा नोटाचा प्रयोग यशस्वी होणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सांगली अवघड होती
भाजपसाठी सांगली मतदारसंघ अवघड होता. त्यामुळे तेथे पक्षाला तडजोड करावी लागली. राष्ट्रवादीमधील संजयकाका पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि आज त्यांचा विजय दृष्टिपथास आल्याचे त्यांनी सांगितले. धुळे येथील सुभाष सांबरे मागील तीन वर्षांपासून भाजपत आहेत. नांदेडमधून उमेदवारी दिलेले डी. बी. पाटील यापूर्वी भाजपमध्येच होते. नंदुरबार येथे हिना गावितांना उमेदवारी दिली. त्यांचे वडील विजयकुमार गावित मंत्रिमंडळात होते. त्याचा फायदाही पक्षालाच मिळणार आहे.

पवार भाजपला फोडू शकले नाहीत
या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपत दाखल झाले. राज्यात धनंजय मुंडेंसारखा प्रयोग करण्याची खेळी हुकल्याने त्यांनी निराशेतून गोपीनाथ मुंडे यांच्यासंबंधी वक्तव्य केले. गोपीनाथ मुंडे यांना बीडमधून पाडण्यासाठी भाजपमधील काही नेते प्रयत्न करीत असल्याचे विधान पवार यांनी केले होते. राज्यात सांगली, नांदेड व नंदुरबार येथील राष्ट्रवादीचे नेते भाजपत सहभागी झाले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रवादी फुटल्याने शरद पवार यांचा तिळपापड झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.