आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा कार्ड युतीच्या अजेंड्यावर - देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशात भाजपची लाट असून राज्यात 48 पैकी 34 जागांवर महायुतीचे खासदार निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. आगामी निवडणुकीत महायुतीने मराठा मतांवर लक्ष केंद्रित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील गेवराईची प्रचार सभा आटोपून औरंगाबादेत आलेल्या तावडे व फडणवीस यांच्याशी बुधवारी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. त्यांनी मांडलेले मुद्दे ....

बीडमध्ये ओन्ली गोपीनाथ मुंडे
‘राज्यात मोदीमय वातावरण असून महायुतीला 34 जागा मिळतील. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीने जर मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित आम्हाला संघर्ष करावा लागला असता. आता मात्र ही निवडणूक एकतर्फी होऊन मुंडे विक्रमी मतांनी विजयी होतील. मराठा मतदारांना निवडणुकीपुरते वापरून नंतर वार्‍यावर सोडणार्‍या दोन्ही काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी मराठा मतदार एकवटले आहेत. हीच मते कॅश करण्यासाठी महायुतीने अजेंडाच बनवला आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते महायुतीत येतील.’

युवक काँग्रेसपासून दुरावला
कलंकित नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या मुद्द्यावरून कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला गोंधळ आणि बहुचर्चित आदर्श सोसायटी गैरव्यवहारातील आरोपी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून जाहीर झालेल्या उमेदवारीवरून राहुल गांधी यांचा दांभिकपणा मतदारांच्या लक्षात आला आहे. काही प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित झालेला युवा मतदार या निर्णयामुळे आता त्यांच्यापासून दुरावला आहे. आगामी निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक सभेत ‘आदर्श’ चेच बॅनर राहतील. काँग्रेसने कलंकित नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन सत्तेची वाट आम्हाला मोकळी करून दिल्याचा टोलाही भाजप नेत्यांनी लगावला.

राजकडे नेतृत्व, पण संघटन नाही
महायुतीची घोडदौड राज्यात मनसेचे ‘इंजिन’ रोखेल म्हणून आमचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मनसेशी युतीचा विचार केला होता. यातूनच गडकरींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी अनावश्यक ठिकाणी मनसेचे उमेदवार न देण्याची विनंती केली होती. मात्र, या भेटीचे वेगळेच अर्थ लावून युतीत दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर खर्‍या अर्थाने राज ठाकरे यांच्याकडेच नेतृत्वगुण आहे, मात्र संघटनाचा अभाव आहे. त्याउलट उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटन असून नेतृत्वगुण नसल्यानेच आम्ही सर्व बाजूंनी महायुतीचा कसा फायदा होईल याचाच विचार करीत आहोत.

संधी साधण्यासाठीच ‘पाहुण्यां’ना तिकीट
इतर पक्षांतील नेत्यांना उमेदवारी देण्याचा प्रयोग आम्ही राज्यात चार ते पाच जागी केला आहे. मात्र, त्या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत आम्ही विजयासाठी सतत लढत होतो, तरीही यश मिळत नव्हते. त्यामुळे ऐनवेळी चालून संधीचे सोने करून घेण्यासाठी आम्ही बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली.