आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बंद देवगिरी’ साखर कारखान्याची लवकरच ‘श्वेतपत्रिका’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्यासहा वर्षांपासून बंद असलेला फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना मतदारांनी बहुमताने ताब्यात दिल्यानंतर तो पुढील गळीप हंगामापर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी स्पष्ट केले. या कारखान्याचे नव्याने ऑडिट करून काय केल्याने फायदा होईल हे ठरवले जाईल, तसेच हा कारखाना कशामुळे बंद राहिला, याची श्वेतपत्रिका लवकरच जारी केली जाईल, असे ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. डॉ. काळे हे कारखान्यावर संचालक म्हणून नसले तरी त्यांचे बंधू याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याची सर्व सूत्रे डॉ. काळे यांच्याकडेच आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघात झालेल्या तीन निवडणुकांत डॉ. काळे यांच्या पॅनलचा वरचष्मा राहिला. मंगळवारी त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली. संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारताना हा कारखाना पुढील गळीप हंगामापर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यासाठी तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढवणे, त्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात कारखान्याचा मोठा वाटा असेल, असेही त्यांनी सांगितले. सहा वर्षांपासून गाळप नाही अन् ६० कोटी रुपयांच्या कर्जामुळे हा कारखाना सध्या बँकेच्या ताब्यात आहे. कारखान्याची जमीन विकून कारखाना ताब्यात घेणे, गाळप करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे या गोष्टी अजेंड्यावर असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. मात्र आतापर्यंत हा कारखाना कशामुळे चांगला चालू शकला नाही, याची माहिती सभासदांसह सर्वांनाच व्हावी याकरिता नव्याने लेखा परीक्षण केले जाईल, त्याच्या प्रती प्रत्येकाला दिल्या जातील. कशामुळे कारखान्याची ‘वाट’ लागली, यापासून बोध घेऊन नव्या वाटेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

एफआरपी हे कारखानदारीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी केवळ साखरेचे उत्पन्न काढून चालणार नाही तर इथेनॉल, देशी दारू निर्मितीवर भर द्यावा लागेल, हे डॉ. काळे यांनी मान्य केले. मात्र आधी कारखान्याचे गाळप सुरू केले जाईल अन् त्यानंतर या दोन्हीही बाबींना प्राधान्य असेल. हा कारखाना गाळपासाठी सज्ज झाला तर त्यानंतरच्या गाळपापासून येथे अन्य उत्पादनेही सुरू होऊ शकतील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

सत्ताधाऱ्यांची मदत घेणार
कारखानापुन्हा सुरू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मदत घेतली जाईल, असे डॉ. काळे यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. सत्ताधारी अर्थात फुलंब्रीचे आमदार तथा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपण जाऊ, त्यांच्याकडे हट्ट धरू, असेही त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कारखान्यात शेअर्स गुंतवले. तो कारखाना सुरू करण्यासाठी बागडे नानांकडे खेटे मारण्यात मला अजिबात कमीपणा वाटणार नाही, उलट ते मी माझे कर्तव्यच समजेल, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

एकतर्फी सत्ता
कारखान्याचे२१ संचालक आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी डॉ. काळे यांच्या पॅनलला त्यापैकी २० जागांवर विजय मिळवून दिला. फक्त एकच जागा भाजपच्या पॅनलला मिळू शकली. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. डॉ. काळे यांचे भाऊ जगन्नाथ काळे यांचीही एकमताने कारखान्याचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.