आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DGP Pravin Dixit Says Public Will Support To Police

मुलाखत: पोलिसांसोबत नागरिकांनी उभे राहावे- प्रवीण दीक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सामान्य नागरिक जेव्हा पोलिसांसोबत रस्त्यावर उभे राहतील तेव्हा समाजाची प्रतिमा बदलेल. ‘पोलिस मित्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्यात बदल घडवण्याचा प्रयत्न राज्याचे नवे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित करत आहेत. एसीबीचे प्रमुख असताना आपल्या कामातून खात्याची प्रतिमा बदलवणारे दीक्षित यांनी पोलिसांच्या दैनंदिन कामातदेखील अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी जालन्याहून - मुंबईकडे रेल्वेने प्रवास करताना जालना ते औरंगाबाददरम्यानच्या प्रवासात त्यांनी दै. दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी मनमोकळा संवाद साधला.

पोलिसांविषयी समाजात विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
उत्तर : पोलिस तळमळीने काम करतात. मात्र, अनेकदा त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचत नाही. कारण त्यांचे काम हे इतर सरकारी खात्यांपेक्षा वेगळे आहे. समाजापर्यंत ही तळमळ आणि प्रयत्न पोहोचवण्यासाठी राज्यात सर्वप्रथम ‘पोलिस मित्र’ ही योजना प्रभावीपणे सुरू करण्यात येणार आहे. समाजातील सर्व स्तरांतील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे सामान्य माणसांनादेखील पोलिसांची तळमळ आणि त्यांचे कार्य जवळून अनुभवता येईल.

पोलिस मित्र ही संकल्पना नेमकी कशी असेल ?
उत्तर : प्रत्येक एका पोलिस कर्मचाऱ्याबरोबर दोन सामान्य व्यक्ती पोलिस मित्र म्हणून काम करतील. ज्या व्यक्तींना पोलिसांसोबत काम करण्याची इच्छा असेल त्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात येईल. म्हणजे एका पोलिस ठाण्याची संख्या १०० असेल तर त्या पोलिस ठाण्यात २०० पोलिस मित्र असतील. अगदी वाहतुकीचे नियंत्रण करण्यापासून तर पोलिस विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांपर्यंत सगळ्यांमध्ये या पोलिस मित्रांचा सहभाग राबवण्यात येईल.

हा उपक्रम कितपत यशस्वी होईल?
उत्तर : अशा प्रकारची योजना मी नागपूर येथे पोलिस आयुक्त असताना २००८ मध्ये सुरू केली होती. त्या वेळी समाजातून खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. गुन्ह्यांच्या प्रमाणापासून तर वाहतुकीच्या प्रश्नापर्यंत अनेक समस्यांवर आम्ही या उपक्रमातून तोडगा काढण्यात यशस्वी झालो होतो. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.

दोषसिद्धताचे (कनव्हिक्शन) प्रमाण वाढवण्यासाठी काही नवीन प्रयोग?
उत्तर : यापुढे पोलिस ठाण्यात नोंदवला जाणारा प्रत्येक गुन्ह्याचा एफआयआर हा चित्रफीत करून नोंदवला जाणार आहे. दोषसिद्धी वाढवण्यासाठी हा नवीन मार्ग पोलिस खात्यात अमलात आणण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांनादेखील विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेकदा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिस मेहनत करून आरोपींना पकडतात. मात्र, त्या वेळी फिर्यादी हा तक्रार मागे घेण्याच्या तयारीत असतो किंवा पंच जवाब बदलतात असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे दोषसिद्धी होत नाही. म्हणून हा डिजिटल रेकॉर्ड करण्यात येणार आहे, जेणेकरून फिर्यादी आणि इतर पुरावे जरी बदलले तरी हा डिजिटल एफआयआर मात्र कायम राहील. त्यासाठी कुठलीही घटना घडल्यानंतर घटनास्थळाचे शूटिंग करण्यात येईल. जवाबाचादेखील
व्हिडिओ काढण्यात येईल. विशेष म्हणजे तक्रार अर्जदेखील आता फिर्यादीच्या स्वत:च्या हस्ताक्षरात घेण्यात येईल.अनेक वेळा पोलिस कर्मचारी मोठ्या अधिकाऱ्यांवर आरोप करतात. काही प्रकरणांत कर्मचाऱ्यांनी आत्महत्यादेखील केल्या आहे.
उत्तर : हो, असे प्रकार होतात. पोलिसांचे काम लक्षात घेता त्यांच्यावर असलेला मानसिक तणाव आणि कामाची व्यस्तता यामुळे अनेक समस्या उद््भवतात. अशा वेळी स्थानिक अधिकाऱ्यांशी कर्मचारी बोलू शकत नाहीत. त्यासाठी थेट पोलिस महासंचालक कार्यालयाला जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचा आता ई-मेल आयडी असेल. त्याद्वारे तो थेट आपल्या समस्या, सूचना या पोलिस महासंचालक कार्यालयापर्यंत पोहोचवू शकेल.

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे?
उत्तर : लोकसंख्या आणि पोलिसांची संख्या असे मोजमाप करता येणार नाही. पोलिसांच्या यशस्वितेसाठी समाजातून मिळणारा प्रतिसाद आणि सहकार्य हे महत्त्वाचे आहे. यासाठीच पोलिस मित्र योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात रिक्त असलेले पोलिस पाटील हे पददेखील पुढील काही महिन्यांत भरण्यात येणार आहे. पोलिस भर्तीचेदेखील नियोजन आहे. खात्यातील ज्या जागा रिक्त आहेत त्या लवकरच भरण्यात येतील.

राज्यात सामाजिक तेढ आहे असे वाटते का? उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या घटनेचा राज्यात काही परिणाम ?
उत्तर : महाराष्ट्रातील जनता ही सुजाण आणि जागरूक आहे. त्यामुळे मला तरी समाजात तेढ किंवा वितुष्ट असे काही वाटत नाही. राज्यातील जनता ही शासनाच्या विविध धोरणांना सहकार्य करणारी आहे.

नवीन सरकारसोबत काम करताना काय अनुभव आहे? थेट मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे त्याचा दबाब जाणवतो का ?
उत्तर : विविध प्रयोग करणारे हे सरकार आहे. त्याच्यासोबतचा कामाचा अनुभव उत्तम आहे. मुख्यमंत्री कल्पक आहेत आणि समाजाभिमुख योजना त्यांच्या पुढाकारामुळे साकारत आहेत. हा अनुभव माझ्यासाठी चांगला आहे.

पोलिस ठाण्यात एफआयआरची संख्या वाढणे म्हणजे गुन्हेगारी वाढली ? त्यामुळे पोलिस गुन्हे नोंदवण्याचे टाळतात का ?
उत्तर : पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे नोंदवून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. एफआयआरची संख्या वाढणे म्हणजे गुन्हेगारी वाढली आहे असे नाही. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर अर्जाचीदेखील शहानिशा होते आणि त्याप्रमाणे तपासाची दिशा आखली जाते हे समजून घेणे आवश्यक आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकरणांचा तपास सुरू होता. आता त्यावर काही परिणाम होईल का ?
उत्तर : असे काहीही नाही. गेल्या वर्षभरात एसीबीने एका हजार ट्रॅप यशस्वी केले आहेत. प्रत्येक विभागाची कामाची एक पद्धत आहे. त्यानुसार काम सुरूच राहील. अधिकारी बदलले तरी त्या कामावर काहीही परिणाम होत नाही.

महासंचालक पदासाठी स्पर्धा होती ?
उत्तर : मला नाही वाटत स्पर्धा होती म्हणून. मला जवाबदारी देण्यात आली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन कमी असल्यामुळे भ्रष्टाचार वाढतो आहे का ?
उत्तर : असे काही नाही. वेतन आणि भ्रष्टाचाराचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. भ्रष्टाचार ही एक वृत्ती आहे. वेतनाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तसे असते तर परदेशातील मोठमोठे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आज गजाआड नसते. ही वृत्ती कमी व्हावी यासाठी समुपदेशन आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे विचार बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पोलिस खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, महासंचालकांचा साधेपणा