आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhananjay Munde Selection On Rashtrawadi Congress District Contact Position Leader

स्थानिक कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे टोपे जिल्ह्याबाहेर, जिल्हा संपर्कनेतेपदी अखेर धनंजय मुंडे यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा संपर्कनेतेपदी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची अखेर नियुक्ती करण्यात आली. सलग वर्षे या पदावर असलेले माजी मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना नको होते. त्यांच्या विरोधात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंडे यांच्याकडे ही सूत्रे सोपवण्यात आली.
विधानसभेपाठोपाठ महानगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्हीही निवडणुकीच्या वेळी टोपे यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रचाराकडे डोळेझाक केली होती. विधानसभा निवडणुकीत ते स्वत: उभे असल्याने इकडे फिरकले नाहीत, तर महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी अंकुशनगर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याचे कारण त्यांनी पुढे केले. तेव्हापासून टोपे यांच्याविषयी नाराजी वाढली होती. उमेदवार निश्चिती करण्याची भूमिका त्यांनी पार पाडली आणि त्यानंतर ते गायब झाले.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एकदाही ते शहरात आले नव्हते. तेव्हाच टोपे हटाव मोहीम सुरू झाली होती. जिल्ह्याची धुरा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे तेव्हाच ‘दिव्य मराठी’च्या वृत्तात म्हटले होते.

जिल्ह्याचे संपर्कनेते असले तरी टोपे हे कार्यकर्त्यांशी चर्चा करत नाहीत, जिल्ह्याला वेळ देत नाही, असा आरोप त्यांच्यावर होत होता. त्यातच माजी शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील टोपे हे एकाच विमानातून मुंबईहून औरंगाबादेत आले. तेव्हा विमानतळावरच दोघांत वादावादी अन् नंतर गुद्दागुद्दी झाली. तेव्हापासून टोपे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष दिले नाही. त्यामुळेच त्यांना हटवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टोपे-पाटील गुद्दागुद्दी
जिल्ह्याच्या संपर्कनेतेपदी मुंडे यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात उभारी येईल का, असा प्रश्न कार्यकर्त्यांनाच पडला आहे. जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार तसेच शहरात तीन नगरसेवक आहेत. यापलीकडे पक्षाची ताकद येथे दिसत नाही. पुढील वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यात हा पक्ष कितपत तग धरतो, यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षे निवडणूक नसल्याने पक्षाचा जनाधार समोर येऊ शकणार नाही.

दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर टोपे हे वर्षे जिल्ह्याचे संपर्कनेते होते. परंतु त्यांचे आमदार सतीश चव्हाण यांच्यापासून स्थानिक कोणाशीही पटले नाही. एकतर निर्णय घ्यायचा नाही आणि घेतला तर स्थानिकांच्या विरोधात अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळेच त्यांच्या विरोधात वेळोवेळी आरोप-प्रत्यारोप होत राहिले. शहराध्यक्षपदी काशीनाथ कोकाटे यांची निवड करताना टोपे यांनी सर्व स्थानिकांचा विरोध फेटाळून लावला होता, हे विशेष.