आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषावार जनगणना, धांग्री भाषा बोलणारे आता शोधायचे कसे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्र सरकारने भाषावार जनगणनेचे काम हाती घेतले असून त्यांनी औरंगाबाद महापालिकेला पत्र पाठवून तुमच्या हद्दीतील वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये धांग्री भाषा बोलणारे किती आहेत याची जनगणना करा, असे फर्मान पाठवले आहे. धांग्री भाषा बोलणारा समाज कोणता, त्यांना कसे शोधायचे त्यांचे सर्वेक्षण करताना लागणारे धांग्रीचे चार जाणकार आणायचे कोठून, अशा भाषिक संकटात मनपा सापडली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जनगणना संचालनालयाने आता मातृभाषा सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यातून भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांबाबत माहिती संकलित केली जात आहे. बोलीभाषा स्वत:ची लिपी असणाऱ्या भाषा त्या भाषा बोलणारे लोक यांची माहिती भारतातील भाषिक सामाजिक जीवनातील बदलाबाबत या सर्वेक्षणातून समोर येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून संचालनालयाने मनपाला पत्र पाठवून मनपाच्या हद्दीत २००१ च्या जनगणनेचा आधार घेत वाॅर्ड क्र. मध्ये म्हणजे आताच्या आसिफिया काॅलनी बेगमपुऱ्याचा पूर्वेकडील भाग येथे धांग्री भाषिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
हे पत्र आल्यापासून मनपाचे अधिकारी संभ्रमात पडले आहेत. धांग्री भाषा नेमकी कोणता समाज बोलतो, तो समाज इथे आहे का, याची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे; पण त्यात काही यश आलेले नाही. संचालनालयाच्या आदेशात म्हटले आहे की, प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करावयाचे आहे. त्यासाठी जनगणना कार्यालयाचा प्रतिनिधी, व्हिडिओग्राफर, धांग्री भाषेचे चार जाणकार एक स्थानिक जाणकार अशी टीम तयार करून पाच दिवसांत हे सर्वेक्षण करावयाचे आहे.
ही तर द्रविडियन भाषा
धांग्रीचे कोडे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने शोधाशोध केली असता १९८१ मध्ये महंमद इश्तियाक यांनी केलेल्या संशोधनात या भाषेचा उल्लेख आढळतो. इश्तियाक यांनी ‘भारतातील अनुसूचित जमातींतील भाषाबदल’ या विषयावर संशोधन केले आहे. मध्य भारतात सर्वेक्षण अभ्यास करून तेथील भाषिक बदलांबाबत निष्कर्ष त्यांनी मांडले. द्रविडियन भाषांच्या दक्षिण, मध्य उत्तर अशा तीन वर्गवारीतील उत्तर द्रविडियन भाषांत धांग्रीचा उल्लेख आहे. १९६१ च्या जनगणनेत धांग्री बोलणाऱ्यांची संख्या ४३७७ नमूद आहे. मात्र, १९७१ च्या जनगणनेनंतर ही भाषा धनवारीमध्ये वर्ग करण्यात आल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
बहुतेकांचा नकारच
‘दिव्य मराठी’ने औरंगाबादेत धांग्री भाषिक आहेत का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आसिफिया काॅलनी बेगमपुऱ्यातील ज्येष्ठ सर्वपरिचित असणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली असता अशी भाषा बोलणारे कुणी नाही, असेच उत्तर दिले.
जाणकार आणायचे कुठून?
मुळात अशी काही भाषा आहे, ती बोलणारे नागरिक शहरात आहेत याचीच माहिती हाती नसल्याने सर्वेक्षण करायचे कसे, या भाषेचे जाणकार आणायचे कुठून, असा प्रश्न मनपा प्रशासनाला पडला आहे.