आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज अर्धा तास चाला; मधुमेह टाळा,धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य मंदार भणगे यांचे व्याख्यान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जीवनशैली ही आरोग्यदृष्ट्या सर्वाधिक आदर्श मानली जाते. मात्र, या जीवनशैलीचा त्याग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मधुमेह फोफावला आहे. रोज अर्धा तास चालल्यास मधुमेह होण्याची शक्यता कमी असल्याचे वैद्य मंदार भणगे यांनी सांगितले.
धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुर्वेद व्यासपीठाच्यावतीने भक्ती गणेश मंदिरात आयोजित महर्षी व्याख्यानमालेत ते बोलत होते. मधुमेह आणि आयुर्वेद या विषयावर त्यांनी विविधांगी मार्गदर्शन केले. या वेळी मंचावर वैद्य सुहास खर्डीकर, वैद्य आनंद कट्टी, वैद्य संतोष नेवपूरकर आणि एस. एम. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. भणगे म्हणाले की, चयापचय प्रक्रियेतील साखळी खंडित होणे हे मधुमेहाचे आरोग्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण कारण आहे. भारतीय जीवनशैलीप्रमाणे सूर्योदयापूर्वी उठणे, सूर्यास्ताआधी जेवणे, रात्री 9 पर्यंत झोपणे, दोन जेवणांमधील योग्य अंतर अशा विविध बाबी बदलत्या जीवनशैलीत कालबाह्य झाल्या आहेत. भेसळयुक्त अन्न सेवन, रसायनयुक्त धान्य आणि भाजीपाला यांचा प्रचंड मोठा धोका आरोग्याला झाला आहे. जंक आणि फास्टफूडचे सेवन अतिप्रमाणात वाढले आहे हे पचनसंस्थेवर घातक परिणाम करतात आणि चयापचय क्रियेचे संतुलन घालवितात. ताणतणावाचे प्रमाण वाढले असल्याने मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. हृदयरोग, सोरायसिस, किडनी या शरीराच्या अंगांवर मधुमेह भयंकर परिणाम करतो. मान काळी पडणे, गुढगे काळे पडणे किंवा काखेत काळे होणे तसेच सतत तहान लागणे, लघवी होणे ही याची काही ढोबळ लक्षणे आहेत.

आयुर्वेदिय विचारांप्रमाणे आळशीपणा, उशिरापर्यंत झोपणे या मधुमेहाचे प्रमाण वाढविणाऱ्या सवयी आहेत. व्यायामाचा आभाव हादेखील सर्वात मोठा परिणामकारक घटक आहेत. यासाठी सर्वांनी अतिशय आग्रहपूर्वक जीवनशैली बदलायला हवी. शरीरयष्टी बनविण्यासाठी जिमला जाणे योग्य आहे. मात्र, आरोग्यदृष्ट्या भारतीय व्यायाम म्हणजे योगा करणे उत्तम आहे, त्यातही सूर्यनमस्कार सर्वोत्तम आहेत.
एकोणीस प्रकारचे विरुद्ध व्यायाम आहेत, ते कटाक्षपूर्वक टाळावे. रात्री उशिरा झोपणे, झोपण्यापूर्वी काही मिनिटे जेवण करणे या चुकीच्या सवयी घालवायला हव्यात. आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावांना आपण सातत्याने सामोरे जातो, यासाठी मानसिक संतुलन गरजेचे आहे. सकाळी लवकर उठून ध्यानधारणा करणे मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम टॉनिक आहे. अर्धा तास चालणे हादेखील सर्वात सोपा उपाय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हे सर्व योग्यरीत्या समजावून सांगण्यासाठी त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा आधार घेतला. वैद्य परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.