आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोपटेश्वर खून प्रकरण : चारित्र्याच्या संशयावरून रेणुकाबाईचे "ऑनरकिलिंग'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धोपटेश्वर(जटवाडा परिसर) येथील रेणुकाबाई गायकवाड खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. रेणुकाबाईचा खून पतीने नव्हे, तर दोन दिरांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेणुकाबाईच्या चारित्र्यामुळे कुटुुंबाची बदनामी होत असल्याच्या कारणाने बाळू गायकवाड (२६) आणि नवनाथ गायकवाड (२४) या दोघांनी तिचा खून (ऑनरकिलिंग) केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जटवाड्याजवळील धोपटेश्वर येथील महादेवाचा डोंगर (चोरदरी) या भागात डिसेंबर २०१४ रोजी १४ महिन्यांपूर्वी पुरलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह धोपटेश्वर गावातील रेणुकाबाई भाऊसाहेब गायकवाड (३२) हिचा असल्याचा संशय पोलिसांना होता. ती हरवल्याची फिर्याद तिचा पती भाऊसाहेब उत्तम गायकवाड (३६) याने १४ महिन्यांपूर्वी दिली होती. मात्र, भाऊसाहेबानेच खून केल्याचा संशय पोलिसांना होता.भाऊसाहेबची चौकशी केली असता बाळू नवनाथ यांनी खून केल्याचे त्याने सांगितले.
...म्हणून केले ठार
रेणुकाबाईचेचारित्र्य चांगले नसल्याची चर्चा बाळू आणि नवनाथच्या कानी पडली होती. चारचौघांत अब्रू जात असल्याचे या दोघांनी भाऊसाहेबला समजावून सांगितले होते. तसेच रेणुकाबाईलाही अनेकदा समजावून सांगूनही तिच्या वागण्यात फरक पडता नव्हता म्हणून तिला ठार केल्याची कबुली दोघांनी दिली.

आधी शेतात मग डोंगरात पुरला मृतदेह :२२ ऑक्टोबर २०११ रोजी बाळू याने रेणुकाबाईला आपल्या घरात बोलावले. तेथे दोघांनी तिचा गळा आवळून ठार केले. घरातील एका पोत्यात मृतदेह कोंबला. दोन दिवसांपूर्वी घराजवळील शेतात खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला, तर दुसरीकडे आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार भाऊसाहेबने पोलिसांत दिली होती. त्यामुळे घराकडे आणि शेतात पोलिसांच्या फेऱ्या वाढल्या होत्या. यामुळे पितळ उघडे पडण्याच्या भीतीने दोघांनी तो मृतदेह खड्ड्यातून काढून धोपटेश्वर येथील डोंगरात पुरला.

भाऊसाहेबलादिली धमकी :आपल्या भावांनीच रेणुकाबाईचा खून केल्याचे भाऊसाहेबला माहीत नव्हते. पोलिस आपल्या पत्नीचा शोध घेत नाहीत म्हणून तो न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे तपासाची चक्रे पुन्हा फिरू लागली होती. भाऊसाहेबला आवरण्यासाठी डिसेंबर २०१४ रोजी बाळू आणि नवनाथ यांनी डोंगरात पुरून ठेवलेले रेणुकाचे प्रेत दाखवून यापुढे तपासासाठी पोलिसांच्या मागे लागलास तर तुझ्या मुलाला मारून टाकू, अशी धमकी दोघांनी दिली. त्यामुळे घाबरून भाऊसाहेब आतापर्यंत शांत होता.

फॉरेन्सिकलॅबच्या रिपोर्टची वाट :पुरलेला मृतदेह रेणुकाबाईचाच आहे का याची खात्री करण्यासाठी डीएनए नमुने मुंबई आणि औरंगाबादच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर मात्र हे प्रकरण अधिक स्पष्ट होईल. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह निरीक्षक हाके, सर्जेराव धोंगडे, प्रवीण पाटील, किरण काळे, तारकचंद खोलवाल, प्रकाश खरात, ओमप्रकाश बनकर, निर्मला ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावला.