आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूत्रांचा पवित्रा: सोलापूर-धुळे महामार्गास विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सोलापूर-धुळे महामार्गामुळे औरंगाबाद झालरक्षेत्रातील तीनशे एकरपेक्षा जास्त विकसित जमिनीवर हातोडा पडत आहे. झाल्टा ते कांचनवाडीदरम्यानचे सात कि.मी. पेक्षा जास्त क्षेत्रातील निवासी क्षेत्र वगळण्यासाठी नवीन पर्यायावर विचार करण्याची मागणी झालरक्षेत्र विकास समितीने रविवारी (20 जानेवारी) जवाहरनगर येथे झालेल्या बैठकीत केली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणांतर्गत येणार्‍या व शहराबाहेरून जाणार्‍या सोलापूर-धुळे महामार्गाच्या चौथ्या टप्प्यातील कामास स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे.

काय आहे महामार्गाचे स्वरूप : सोलापूर-बीड-औरंगाबाद-धुळे या 452 कि.मी. मार्गाच्या निर्मितीचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे. चौपदरी होणार्‍या महामार्गामधील औरंगाबाद ते धुळे अंतर 162 कि. मी. इतके आहे. या मार्गाची माहिती भारत सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आली असून औरंगाबाद शहराबाहेरील चौथ्या टप्प्यातील काम अद्याप प्रसिद्ध होणे बाकी आहे.

काय आहे वादाचे मूळ : झाल्टा ते नक्षत्रवाडी परिसरात तीनशे एकरपेक्षा जास्त जमीन या मार्गामुळे बाधित होत आहे. उपरोक्त जमीन निवासी क्षेत्रात येते. बहुतांश जमीन एनए 44 झालेली आहे. ही बाब महामार्गाच्या निर्मितीसाठी आयोजित बैठकीत एकाही अधिकार्‍याच्या लक्षात आली नाही. प्रोजेक्टरवर महामार्गासंबंधी माहिती देत असताना आक्षेप का घेण्यात आला नाही, असा प्रश्न झालर समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

पर्यायी मार्गाचा विचार व्हावा : झालर समितीचा विकासाला विरोध नाही. शहरालगत गांधेली, देवळाई, सातारा, बाळापूर एवढीच जागा निवासी क्षेत्रात शिल्लक आहे. बीड बायपास रस्त्याचा पर्याय म्हणून विचार व्हावा. केंब्रिज हायस्कूल ते हसरूल सावंगी या जालना व जळगाव रस्त्याला जोडणार्‍या बायपासचा महामार्गासाठी विचार व्हावा. हसरूल सावंगी ते मिटमिटा या बायपासला महामार्ग जोडला जाऊ शकतो. नाशिक शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाला सात कि.मी. पेक्षा जास्त उड्डाणपूल देण्यात आला आहे. असा पर्याय डोळ्यासमोर ठेवला जावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

मार्गासंबंधी झाली होती बैठक : वरील मार्गासंबंधी प्रकल्प संचालक व्ही. जे. चामरगोरे यांनी 13 जुलै 2012 रोजी बैठक बोलावली होती. यानुसार बैठक 18 जुलै 2012 रोजी झाली. बैठकीत महामार्गासंबंधी प्रोजेक्टरवर माहिती देण्यात आली होती. उपरोक्त बैठकीस उपसंचालक नगररचना विभाग, मनपा नगररचना विभागाचे सहायक संचालक, वरिष्ठ रचनाकार सिडको, अधीक्षक अभियंता सा. बां. विभाग, मुख्य अभियंता रस्ते विकास महामंडळ, मुख्याधिकारी एमआयडीसी आदींची उपस्थिती होती. नागरिकांच्या आक्षेपामुळे झाल्टा ते माळीवाडापर्यंतच्या रस्त्याची प्रक्रिया गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्याचे स्थगित करण्यात आले आहे.