आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी स्वत:चे घर बनविण्याकडे युवकांचा कल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ‘लग्न पाहावे करून अन् घर पाहावे बांधून’ ही म्हण सर्वांनाच माहिती आहे. या दोन्ही बाबी आयुष्यात महत्त्वाच्या आणि खूप खर्चीक असतात. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत असल्याने घरातील युवकांना घराचे काही टेन्शन नसायचे; परंतु आता कुटुंबपद्धत वेगाने बदलत आहे. नोकरीनिमित्त तरुण कधी शेकडो मैल दूर तर कधी परदेशातही धाव घेतात.
अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबासाठी घर ही आवश्यक बाब होऊन बसली आहे. त्यामुळे बदलत्या समाजात आता लग्नापूर्वी घर ही संकल्पना जोर धरू लागली आहे. एकदा घर झाले की, बाकीचे टेन्शन नाही. शिवाय कुटुंबासाठी हक्काचे छप्परही होते. त्यामुळे नोकरीस असलेले तरुण घरासाठी गुंतवणूक करीत आहेत. पूर्वी लग्न, मुले, नंतर त्यांची लग्ने आणि पैसे उरलेच तर रिटायरमेंटला घर असा प्रवास असायचा; परंतु आता हे चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. तरुणांमध्ये सामाजिक, आर्थिक बदल होताना दिसत आहेत. आज गृहकर्ज व मिळणारे घसघशीत वेतन यामुळे घर घेणेही सोपे झाले आहे. त्यामुळे घराकडे जास्त गुंतवणूक होताना दिसते.
मुलगा-मुलगी दोन्ही कमावणारे असले तर उत्तमच! अशा वेळी मोठे घर किंवा बंगला याकडे गुंतवणूक होताना दिसते. सध्या मोठय़ा घरांना तरुणांची पसंती असून, ऐपतीनुसार टू, थ्री-बीएचके फ्लॅटला पसंती मिळताना दिसत आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत तरुण पिढी सजग होतानाचे चित्र दिसत आहे.
घर घेतल्यानंतर लग्नानंतरचे आयुष्य सुखात असा सर्वांचा समज आहे. प्रॉपर्टीत गुंतवणूक करणारे तरुण 25 ते 35 वयोगटातीलच जास्त दिसत आहेत. घराकडे आयुष्यभराची गुंतवणूक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. ‘आधी घर नंतर परिवार’ असा विचार समाजात रूढ होत आहे.