आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Solapur National Highway Issue At Aurangabad

धुळे-सोलापूर नॅशनल हायवे शहरालगत नको;15 दिवसांनंतर ठरणार रस्त्याचा मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्तावित केलेला धुळे-येडशी हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 211) शहराच्या खूप जवळून जातो. तो आणखी दूर असावा, अशी सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना केली. भविष्यात पुन्हा अडचणी नको म्हणून ही सूचना करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत पुढील बैठक होणार असून यावेळी अंतिम निर्णय होऊ शकतो.

या मार्गासाठी प्राधिकरणाच्या वतीने रेखांकन करण्यात आले असून त्यावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या दालनात गुरुवारी (4 जुलै) बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता (नागपूर) डी. सी. तावडे, स्थानिक प्रमुख यू. जे. तामरगोरे, उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांची उपस्थिती होती.

प्रस्तावित रस्त्याचा मार्ग शहराच्या खूपच जवळून जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बैठकीत अधिकार्‍यांनी फक्त भूसंपादनाच्या मुद्दय़ांवर चर्चा केली. त्यानंतर हे सर्व अधिकारी प्रत्यक्ष जागेच्या पाहणीसाठी गेले.

बीड बायपास, भारत बटालियन आणि पैठण रस्ता या ठिकाणी अधिकार्‍यांनी पाहणी केली. शहरापासून आणखी दूर हा रस्ता न्यायला हवा, अशा सूचना मिळाल्याने प्राधिकरणाला नव्याने रेखांकन करावे लागणार आहे.

असा आहे रस्त्याचा सध्याचा मार्ग
औरंगाबाद- निपाणी-माळीवाडा
निपाणी, आडगाव, गांधेली, पुढे एएस क्लबमार्गे भांगसीमाता डोंगर, माळीवाडा व पुढे वेरूळ असा 52 किलोमीटरचा हा रस्ता आहे.

प्रशासनाच्या अपेक्षा
शहराचा विस्तार जोमाने होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गांधेलीपर्यंत शहराचा विकास होईल. परिणामी हा महामार्ग पुन्हा शहरात येईल आणि बीड बायपाससारखी अवस्था होईल. बीड बायपास पूर्वी याच महामार्गाचा भाग होता, परंतु आता तो शहराच्या वस्तीत आल्याचे चित्र आहे. त्यावर बाहेरची वाहने कमी आणि शहरातील अंतर्गत वाहनेच जास्त प्रवास करतात. त्यामुळे नियोजन करतानाच हा रस्ता शहरापासून जास्तीत जास्त दूर ठेवणे गरजेचे आहे.

आता पुढे काय ?
नेमका रस्ता कोठून न्यायचा हे ठरवले जाईल. त्यानुसार पुन्हा ले-आऊट सादर केले जाईल. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान होईल.

15 दिवसांत पुढील निर्णय
या प्रस्तावित साइट व्हिजिट केली. प्राधिकरणाला काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पंधरा दिवसांत पुढील बैठक होईल.
-विक्रमकुमार, जिल्हाधिकारी