औरंगाबाद- माजी आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्यात अयशस्वी झाल्यानंतरही पालिकेतील
आपला दबदबा कायम असल्याचा खासदार चंद्रकांत खैरे यांचा दावा आहे.
माझ्याच आग्रहावरून सुनील केंद्रेकर यांच्याकडे पालिका आयुक्तपदाची सूरे गेली असल्याचे सांगतानाच पालिकेच्या तिजोरीची परिस्थिती लक्षात घेता यापुढे शहरात डिफर पेमेंटच्या रस्त्यांच्या कामांना लगाम घातला जाईल, अशी कामे होऊ दिली जाणार नाहीत, असे खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यापुढे कोणत्याही परिस्थितीत डिफर पेमेंटवरील (आधी काम, नंतर पैसे) रस्ते हाती घेण्यात येऊ नयेत, असे पत्र सोमवारी आयुक्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समांतर जलवाहिनी तसेच भूमिगत गटार योजनेसाठी पालिकेकडे पैसे नाहीत. त्यातच केंद्राने निधी देताना आता ८० टक्क्यांऐवजी ५० टक्केच रक्कम देण्याचे ठरवले आहे. अशा परिस्थितीत पालिकेने अंथरून बघून पाय पसरायला हवेत. परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. कोणतीही कामे केली जातात. कोणीही उठतो अन् तिजोरीत पैसे नसतानाही डिफर पेमेंटवर माझ्या वाॅर्डात रस्ता करा म्हणतो. परंतु यापुढे तसे होऊ दिले जाणार नाही. आपण तसे पत्रच नवीन आयुक्तांना देणार असून या कामाला रोख घातला जाईल, असा दावा त्यांनी केला.
आता म्हणाल, महाजन बरे होते
प्रकाशमहाजन यांना येथेच आयुक्त म्हणून निवृत्त होऊ द्यावे, अशी खैरे यांची इच्छा होती. परंतु शिवसेना तसेच भाजपचे सर्वजण एकत्र आल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता केंद्रेकर यांच्या खांद्यावर ही जबाबदारी काही काळासाठी सोपवण्यात आली आहे. त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, ज्या नगरसेवकांनी महाजन यांच्याविरोधात मोहीम उघडली तेच नगरसेवक येत्या काही दिवसांत ‘महाजनच बरे होते’ असे म्हणताना दिसतील, असा दावा केला. त्याचबरोबर केंद्रेकरच येथे आयुक्त म्हणून यावे ही आपलीच इच्छा होती, असेही त्यांनी सांगितले.