आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठीण प्रसंगात सकारात्मकता शोधल्यामुळे यशस्वी झालो, यशवंतांच्या संघर्षमय जीवनाचा उलगडला प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: तक्रार करण्यापेक्षा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नांची उकल करण्यासाठीच प्रत्येक कठीण प्रसंगात सकारात्मकता शोधत गेलो आणि यश मिळवू शकलो, अशी भावना विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तरुणांनी व्यक्त केल्या. यातून खऱ्या जीवनाचा आनंदोत्सव नेमका काय आहे, याचे रहस्य रविवारी आयोजित वेध परिषदेत पालक आणि विद्यार्थ्यांना उमगले. 
 
जगतगुरू संत तुकोबाराय नाट्यगृहात टेंडर केअर होम औरंगाबाद आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मान्यवरांनी मिळून १० व्या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेचे आयोजन केले होते. यात तरुण आयटी उद्योजक मुक्तक जोशी, माउंट एव्हरेस्टवीर रफीक शेख, आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री पूर्वा नीलिमा सुभाष आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांच्या कार्यप्रवासाविषयी संवाद साधत यशाचे रहस्य उलगडण्यात आले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी विंग कमांडर यू.डी.केकरे, शैलजा केकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 
 
जगण्यातला छोटा आनंद म्हणजे उत्सव : जोशी 
वेधपरिषदेच्या पहिल्या सत्रास मुक्तक जोशी यांच्या प्रकट मुलाखतीने प्रारंभ झाला. पहिली सॉफ्टवेअर कंपनी स्थापन्यापासून ते न्यूजर्सी, सर्व्हिस देणाऱ्या ईबेय या जगविख्यात कंपनीशी व्यावसायिक सहभागापर्यंतचा प्रवास या मुलाखतीदरम्यान जोशी यांनी मांडला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ध्येय ठेवायला हवे. छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच उत्सव असतो. आयुष्याची सजावट म्हणजे स्तुती आणि पैसा आहे. मखर म्हणजे समाजातील स्थान आणि मूर्ती म्हणजे तुमचे एक व्यक्ती म्हणून असलेले मूल्य आहे, असे जोशी म्हणाले. 

आयुष्य देण्यासाठी आहे : अधिक कदम 
काश्मीरमध्ये अनाथ झालेल्या मुलींसाठी काम करणारे अधिक कदम यांनी जीवनाच्या उत्सवाविषयी सांगितले की, आपला जन्म देण्यासाठी आहे. माझ्यातील अाध्यात्मिक साधनेमुळेच आंतकवाद्यांशी सामना करू शकलो. मातृत्वाची भावना जशी दु:खातून येते, तशीच आयुष्यातही सुखासाठी, आनंदासाठी दु:ख असले पाहिजे, असेही कदम म्हणाले. 
 
गरिबीची लाज वाटू देऊ नका : कुलकर्णी 
गरिबीची लाज वाटू देऊ नका. आयुष्यात अनेक चढ-उतार आले. परिस्थितीही गरिबीची होती. परंतु माझ्या आईने नेहमीच प्रत्येक वळणार मला खंबीर बनवले. माझ्या यशात माझ्या चांगल्या शिक्षकांचा वाटा आहे. औरंगाबादमधील शैक्षणिक, सामाजिक आणि चळवळींचं मी प्रॉडक्ट आहे. शहर सोडण्याची तयार दाखल्यामुळे अनेक नामवंत कलावंत इथेच आहेत. 
 
गरीब परिस्थिती नव्हे, मानसिकता : डॉ.भारूड 
आयुष्यातगरीब परिस्थिती नसते तर ती मानसिकता असते. प्रत्येक वेळी संधीचा फायदा घ्या, तक्रार करता सकारात्मकता शोधा, असे आवाहन हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणारे भिल्ल समाजातील आयएएस अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. भिल्ल वस्तीत छोट्याशा झोपडीत आम्ही राहायचो.
 
वडील वारल्यानंतर आईने खस्ता खात मला आणि बहिणीला सांभाळले. मोहाची दारू काढून तीवर उदरनिर्वाह चालवला. शाळेत जेवायला मिळायचे म्हणून शाळेत जाण्याची सवय लागली. पुढे शिक्षणाची गोडी निर्माण झाली. परंतु तिथेही भिल्लाचं पोर तू, शिकून काय डॉक्टर, कलेक्टर होणार का,अशी हेटाळणी झाली. आईने मात्र आम्हा भावंडांना चांगले शिकवायचे ठरवले. मी आयएएस अधिकारी बनलो. 
 
एव्हरेस्टने मला जिंकले : रफिक शेख 
एव्हरेस्टवीर होताना आलेला थरारक अनुभव तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र पोलिसमधील पहिला माउंट एव्हरेस्टवीर रफिक शेख याने सांगितले, तो त्याच्याच शब्दात. मी एव्हरेस्टला नाही तर एव्हरेस्टनेच मला जिंकलंय.
 
दोनदा नैसर्गिक आपत्तीमुळे लक्ष्यापर्यंत पोहचू शकलो नाही. मात्र अथक प्रयत्नांमुळे तिसऱ्या प्रयत्नांत ते शक्य झाले. भूकंप आला होता तेंव्हा त्यात आपण मरणार याची भीती नव्हती तर इतके कष्ट आपण इथवर येण्यासाठी घेतलेतच, तर पुन्हा मागे जायचे नाही हा विचार त्या वेळी मनात होता. समाजात कसं रहावं हे गिर्यारोहणामुळे शिकलो.