औरंगाबाद - होलिक्रॉस इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या कमी दिल्या जातात. तसेच मुला-मुलींना एकाच बेंचवर बसवले जाते, तर मुलींना कमी आकाराचे स्कर्ट सक्तीचे केले जातात. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या स्थानिक सुट्या दिल्या जातात त्यादेखील दिल्या जात नाहीत. त्यामुळे निषेध म्हणून गुरुवारी शिवसेनेच्या वतीने राष्ट्रगीत लिहिलेला फलक, टिकली, कुंकू, बांगड्या कर्णफुले असे साहित्य मुख्याध्यापिकेला भेट देण्यात आले.
होलिक्रॉस शाळेत राष्ट्रगीत तसेच भारतीय संस्कृतीचा राजरोसपणे अवमान होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या वतीने शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याध्यापिका सिस्टर जेनिफर यांची भेट घेऊन विद्यार्थिनींना कुंकू, टिकल्या, बांगड्या, कर्णफुले हे अलंकार परिधान करू दिले जात नसल्याचा जाब विचारला. या वेळी उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, किशोर कच्छवाह, सुनीता आऊलवार, माधुरी जोशी, सुनीता देव, प्रतिभा जगताप, अनिता मंत्री, संजय हरणे यांची उपस्थिती होती.