आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठामागील डोंगररांगांतील पाणी अडवणार, उद्योजकांनी खोदले 5 तलाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे गोगाबाबा टेकडी ते औरंगाबाद लेणीपर्यंतच्या डोंगररांगांमध्ये पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्याचा प्रयत्न काही उद्योजकांनी चालवला आहे. लहान लहान 5 तलाव खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातून किमान 20 कोटी लिटर पाणी मिळू शकते, असा या उद्योजकांचा दावा आहे.
भविष्यात दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून प्रत्येक थेंब वाचवणे, मुरवणे गरजेचे आहे. या लहान-मोठय़ा प्रयत्नांच्या प्रत्येक थेंबानेच समृद्धीचे तळे भरू शकते.

विद्यापीठाच्या मागे सोनेरी महालापासून 200 ते 250 हेक्टर परिसरात छोटीशी डोंगररांग आहे. त्यातच शहरातील सर्वात उंच म्हणून प्रसिद्ध असणारी गोगाबाबा टेकडीही आहे. या टेकडीपासून ते औरंगाबाद लेणीपर्यंत डोंगरावर पावसाळ्यात पडणारे पाणी योग्य नियोजन नसल्याने वाहून जाते. काही ठिकाणी नैसर्गिक दरीवजा खोलगट भाग आहेत, पण तेवढा भाग सोडला तर डोंगरावरून प्रचंड वेगाने वाहत येणारे पावसाचे पाणी सरळ विद्यापीठाच्या आवारात येते.

नैसर्गिक रचना
डोंगररांगांतील हा भाग ओंजळीसारखाच आहे. चोहोबाजूने पाणी खाली मैदानावर आल्यावर या ओंजळीवजा मैदानात जमा केले जाऊ शकते. त्यासाठी या जागी मोठा तलाव खोदला तर डोंगरावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साठवणे शक्य होईल असा विचार शहरातील एक उद्योजक संदीप नागोरी यांनी केला. लगेच औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून आपल्या मनातील या कल्पनेला मूर्त रूप देण्याच्या हालचाली सुरू केल्या.

अशी सुचली कल्पना
लघुउद्योजक असलेले नागोरी अनेक वर्षांपासून पहाटे गोगाबाबा टेकडीवर फिरायला जातात. या वर्षी सर्वत्र भीषण दुष्काळाच्या झळा बसत असल्याने व्यायामाला बरोबर आलेल्या मित्रांबरोबरच त्यांच्या दुष्काळ आणि पाणीटंचाईवरच चर्चा होऊ लागल्या. यातूनच नागोरी यांच्या डोक्यात ही कल्पना आली. गेली काही वर्षे त्यांनी पावसाळ्यात या डोंगररांगांमधून पडणारे आणि खाली वाहत जाणार्‍या पाण्याचे निरीक्षण केले आहे. योग्य नियोजन करून या ठिकाणी पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवला तर निश्चितच मोठय़ा तलावात साठते तेवढे पाणी साठवता येईल असा विचार त्यांनी केला. भगतसिंग दरक व श्याम शिंदे या त्यांच्या दोन उद्योजक मित्रांनीही त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

अन् तळे बांधण्याचा घेतला ध्यास
ही जमीन विद्यापीठ प्रशासन व गायरान भाग असल्याने जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण त्यावर आहे. त्यामुळे परवानगी मागताच जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी फोरमच्या या योजनेला तत्काळ होकार दिला. लगोलग कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनीही परवानगी दिली.

कामाला मिळाली गती
कुणीतरी चांगल्या कामासाठी पुढे येत आहे हे पाहून जिल्हा प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाने उद्योजकांच्या या कल्पनेला परवानगी दिल्याने एप्रिल महिन्यात नागोरी यांनी काम सुरू केले. सुरुवातीला पाटबंधारे विभागातील दोन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी या भागात छोटे छोटे 5 तलाव व 7 मोठे नाले तयार करण्याचा निर्णय घेतला. मशीन, ट्रॅक्टर घेऊन काम सुरूही केले. बघता बघता महिनाभरत 8 लाख रुपये खर्च करून त्यांनी या कामाला गती दिली.

महिनाभरात काम पूर्ण होणार
कामाची सुरुवात कशी व कोठून करायची याचे नियोजन त्यांनी केले. पाच हजार ट्रॅक्टर माती निघाली. पाच तलावांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांतच हे काम पूर्ण होईल.

..तर साठेल 20 कोटी लिटर पाणी
छोटे 5 तलाव बांधले असले तरी ते सगळे एकत्र करणे आणि डोंगरांच्या कॅचमेंट एरियात आणखी तलाव खोदून त्याचा एकच मोठय़ा क्षमतेचा तलाव या ठिकाणी तयार झाला तर किमान 20 कोटी लिटर पाणी साठू शकेल, असा उद्योजकांचा दावा आहे. यातून 3 ते 4 लाख लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.

काही भागातील पातळी वाढेल
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मिटमिटा ते सिटी चौक या भागातील जमिनीच्या पाण्याची पातळी अगदी दहा फुटांवर येऊ शकते. सध्या ही पातळी 100 फुटांपेक्षाही खाली गेली आहे.