आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासत्तेसाठी डिजिटल इंडिया योजना उपयुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रशासनाची डिजिटल इंडिया ही योजना भारत महासत्ता होण्यासाठीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यापीठ स्तरावर डिजिटल विद्यापीठात ही संकल्पना शंभर टक्के अस्तित्वात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केले. ते जुलैदरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह पाळण्यात आला असून मंगळवारी (७ जुलै) समारोपीय सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. स्मिता अवचार, युनिकचे संचालक डॉ. सचिन देशमुख, संगणकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख, रामानुजन संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. सी. मेहरोत्रा, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. चोपडे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी डिजिटल इंडिया या दोन महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या असून आपल्या विद्यापीठाने यासंदर्भात परिषदेचे आयोजन यापूर्वीच केले आहे. डिजिटल इंडिया मोहीम ही भारताला भ्रष्टाचारमुक्त, गतिमान कार्यक्षम प्रशासन या प्रक्रियेकडे नेणारी ठरेल. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून डिजिटल पद्धतीमुळे प्रशासनात गतिमानता आली आहे, आगामी काळात मानवी मेंदूला चालना देण्यासाठी ‘चिप’ विकसित होईल, असे डॉ. काळे म्हणाले. स्मार्ट सिटी हा उपक्रम भारताला स्वच्छता, नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता इको-फ्रेंडली वातावरण या त्रिसूत्रीसाठी उपयोगी ठरणार असल्याचा विश्वास डॉ. मेहरोत्रा यांनी व्यक्त केला. आयसीटी तंत्रज्ञानामुळे जगभरात उच्च शिक्षण क्षेत्रात मूलभूत दूरगामी परिणाम करणारे बदल होत असल्याचे डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले. डॉ.सचिन देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशन धाबे, डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. अरुण खरात, डी.एल.पाटील, संजय राजपूत उपस्थित होते.