आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरातील हॉटेल वृंदावनच्या खोलीत दिलीप शरद पठारे (३४, रा. साईनगर, सिडको) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री ते हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पठारे यांच्यावर ५२ लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल होता. ते सध्या औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे शहर सचिव होते.
दिलीप यांना भेटण्यासाठी त्यांचे भाऊ सुशांत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता हॉटेलमध्ये आले. व्यवस्थापक नामदेव बनकर यांनी रूममध्ये फोन लावल्यानंतर कोणीही उचलत नसल्याने हॉटेलमधील नोकर किसन थापाने बनावट चावीने दरवाजा उघडला. तेव्हा दिलीप यांनी पांढऱ्या कपड्याच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पलंगावर सुसाइट नोट असल्याचे बनकर म्हणाले. दिलीप यांना ९ तारखेला रात्री ११ वाजेच्या सुमारास अल्टो गाडीत एका व्यक्तीने सोडले होते. ती व्यक्ती दिलीप यांच्यासोबत रूममध्ये १५ मिनिटे होती, असे बनकर म्हणाले. दिलीप पुण्याला जाणार असल्याची नोंद हॉटेल डायरीत आहे. वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, उपनिरीक्षक अनिलकुमार पांडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
मानसिक त्रासामुळे जीवन संपवले
निवृत्त शिक्षिका कांताबाई दयानंद भोसले यांनी ८ नोव्हेंबरला मुलगी छाया आणि तिचा मित्र दिलीप यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात ५२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. पठारेवर यापूर्वीही दोन आर्थिक व्यवहाराची प्रकरणे दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या दोन्ही प्रकरणांत अटक वॉरंट काढण्यात आले होते. तेव्हापासून ते फरारच होते. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या सहावर्षीय मुलीचे निधन झाले होते. आर्थिक दडपणाखाली त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. दिलीपने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली असून त्यात कांताबाई आणि त्यांच्या सुनेने मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद असल्याचे बहुरे यांनी सांगितले.