आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती डिंकाचे लाडू ते लघुउद्योगापर्यंत मजल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यामध्ये घराघरात डिंकाचे लाडू तयार होतात. त्यामुळे लाडू करणे ही तशी सामान्य बाब. मात्र, डिंकाचे लाडू तयार करणे, लोकांच्या पसंतीला उतरणे, घरगुती व्यवसाय ते लघुउद्योगापर्यंत मजल मारणे ही निश्चितच विशेष बाब. त्यातच एका महिलेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे वास्तवात आणत महाराष्ट्रभर मजल मारणे हे यश.. त्यामुळेच आजची यशोगाथा संगीता डोंगरकर पाठक यांची.
जालना जिल्ह्यातील आष्टीच्या संगीता डोंगरकर -पाठक या लग्नानंतर औरंगाबादेत स्थायिक झाल्या. सामान्य गृहिणी म्हणून संसाराचा गाडा हाकत असताना काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, नेमके काय करावे हे सुचत नव्हते. पुढे गृहउद्योगाचा विचार त्यांनी पक्का केला. मात्र, कोणती कोणता उद्योग करावा हा विचार करत असतानाच त्यांना डिंकाचे लाडू करण्याचा विचार आला. शहरी भागात याची गरज लक्षात घेता त्यांनी हा विचार वास्तावात आणला. आईला लाडू करताना केलेली मदत आणि तिची पद्धत कामी आली. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी या कामाचा श्रीगणेशा केला.
शून्य वाढत गेले...
संगीता पाठक यांनी पाच किलो लाडूंपासून तीन वर्षांपूर्वी सुरुवात केली. शेजारी आणि परिचितांना ते विकले. सर्वांना ते खूप आवडले आणि त्यानंतर पाठक यांनी मागे वळून पाहिले नाही. दरवर्र्षी त्यांच्या उत्पादनाच्या मागणीत शून्य वाढत गेला. पाच किलो, पन्नास किलो आणि आता दर महिन्याला पाचशे किलोपर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
लक्षी-व्यंकटेश एंटरप्राइजची स्थापना
आपण डिंकाच्या लाडवांचा मोठा उद्योग करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांनी बँकेकडे गृह उद्योगासाठी कर्ज मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. एसबीआय बँकेने ते मंजूर केले. एक छोटेसे ग्राइंडर मशीन घेऊन त्यांनी हे उत्पादन लक्ष्मी-व्यंकटेश या नावाने सुरू केले. त्यासाठी बीड बायपास येथे दोन खोल्या भाड्याने घेतल्या. या कामात सुरु वातीला एक महिला मदतीला होती. आता त्यांनी पाच महिलांसह नऊ जणांना रोजगार दिला आहे.
‘लाइफ’ची निर्मिती - डिकांचा लाडू बाहेरगावी पाठवत असताना फुटण्याची समस्या निर्माण झाली. त्यातून मार्ग काढत, पाठक यांनी छानशा डब्यात ते पॅक करायला सुरुवात केली. पुढे या उत्पादनाला काहीतरी नाव द्यावे हा विचार करून ‘लाइफ’ ब्रँडची जन्म झाला. एका लाडूचे वजन 45 ग्रॅम आहे. ते अर्धा किलो आणि एक किलोच्या पॅकमध्ये 320 रुपये किलो दराने मिळतात. संगीता यांना या उद्योगात मिळालेली ‘लय’ पाहून इतरही प्रेरणा घेऊ शकतात. त्यामुळे लाडूंवर त्यांनी ताबा मिळवला असला तरी लोणची, पापड, मसाल्यांपासून ते आणखी काहीतरी भन्नाट करण्याचा विचार करा आणि लागा कामाला.