आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipak Patave Article On Shivsena Politics In Aurangabad

धन्य तो शिवसेना पक्ष आणि धन्य त्याचे नेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघटनात्मक राजकारणाची पातळी किती खाली नेता येऊ शकते, हे दाखवण्याची घृणास्पद स्पर्धा सध्या औरंगाबादच्या शिवसेनेत सुरू आहे. खासदार आणि शिवसेनेचे उपनेतेपद भूषवणारे चंद्रकांत खैरे यांच्यासारखा ज्येष्ठ राजकारणी त्या स्पर्धेत अग्रभागी असावा, याला काय म्हणायचे? "अरे'ला "कारे'ची भाषा वापरणे आणि प्रसंगी हाणामारीला तयार असणे हे शिवसेनेचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच शिवसेना तरुणांमध्ये आणि सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये प्रिय आहे हे खरे; पण ती भाषा आणि हाणामारीची तयारी समाजकंटकांच्या विरोधात, अन्याय, अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात वापरली जाते म्हणून प्रिय आहे हे विसरता येत नाही. औरंगाबादच्या शिवसेनेला, विशेषत: खासदार खैरे यांना मात्र त्याचे विस्मरण झालेले दिसते. म्हणूनच त्यांनी महापालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांचे "तंगडे' तोडण्याची भाषा उघडपणे केली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या विरोधातही ते काहीशा तशाच भाषेत बोलले. त्याचे पडसादही उमटले. राजेंद्र जंजाळ थेट खैरे यांच्या घरासमोर जाऊन बसले. खरे तर ते घरी नसताना जंजाळ यांनी त्यांच्या घरी जाणे योग्य नव्हतेच; पण उपनेतेच संयम ठेवत नसतील तर जंजाळ यांच्याकडून तरी संयमाची अपेक्षा कशी करणार? आणि हे दाेघे संयम ठेवणार नसतील तर सर्वसामान्य शिवसैनिकांनी तो पाळावा, असा आग्रह कसा धरता येईल? थोडक्यात, सर्वांनीच पातळी साेडून खालीच यायचे ठरवले तर पक्ष तरी कसा वर राहील? अर्थात, असल्या पक्षहिताची काळजी असती तर स्थानिक शिवसेनेत हे घडलेच नसते, हेही खरे आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या धार्मिक दंगलींनंतर शिवसैनिकांचा आधार वाटणारा मोठा वर्ग या शहरात होता. त्यामुळेच इथे शिवसेना झपाट्याने वाढत गेली. भाजपदेखील हिंदुत्ववादी असूनही औरंगाबादकरांनी शिवसेनेलाच जास्त पसंती दिली. कारण तात्त्विक चर्चा करीत बसण्याऐवजी आवश्यक तिथे आक्रमक होऊन संरक्षण करणारे याच पक्षात आहेत, ही त्यांची धारणा होती. किंबहुना अजूनही ती आहे; पण तीच आक्रमकता आपापसात भांडण्यासाठी आणि गटबाजीचे हीन प्रदर्शन घडवण्यासाठी शिवसेनेतले स्थानिक नेते वापरीत असतील तर औरंगाबादकर त्याचेही स्वागत करतील, अशा भ्रमात या नेत्यांनी राहू नये. महापालिकेच्या सातारा-देवळाईच्या पोटनिवडणुकीत त्याचा प्रत्यय औरंगाबादकरांनी आणून दिलाच आहे. त्यातून शहाणे होण्याऐवजी आणखी पातळी सोडण्यातच या नेत्यांना धन्यता वाटते आहे. राजकारणाविषयीची एक विकृत प्रतिमा ही मंडळी त्यातून तयार करीत आहेत, जी सुसंस्कृत व्यक्तींना राजकारणापासून अधिक दूर नेणारी आणि पर्यायाने समाजाची दीर्घकालीन हानी करणारी आहे.
महापालिकेतली भाजपची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शिवसेनेसाठी फायद्याचा ठरणाऱ्या एमआयएमची आक्रमकता हळू हळू कमी होत चालली आहे. ज्यांनी या शहरातल्या दंगली पाहिलेल्या नाहीत अशा नवमतदारांची संख्या वाढत चालली आहे. या सर्व बाबी शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. त्या अनुषंगाने पक्षसंघटनेला नवी दिशा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने काही विचारमंथन करण्याची, नवा कार्यक्रम देण्याची गरज असताना पक्षाचे नेते म्हणवून घेणारेच जर तंगड्या तोडण्याची भाषा करीत असतील तर पक्षाच्या भविष्याबद्दल विचार केलेलाच बरा.

एकीकडे दुष्काळग्रस्त भागात निधीचे वाटप, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे सामूहिक विवाह लावणे अशा कार्यक्रमांनी शिवसेनेची एक वेगळी प्रतिमा मराठवाड्यात घडते आहे. तीच प्रतिमा त्यापेक्षा अधिक क्षमतेने मलिन करण्याचे काम शिवसेनेचे नेतेच करीत आहेत. धन्य तो पक्ष आणि त्याचे नेते.