आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipak Patave Special Article On Aurangabad Corporation Election

भाष्य : धर्माच्या नव्हे, विकासाच्या मुद्द्यावरच झाली निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरूनही जिंकतोतो बाजीगर असतो, अशा शब्दांत ऋषिकेश खैरे यांनी विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचेच वडील आणि औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांची आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची अवस्था मात्र जिंकूनही हरल्यासारखीच आहे.
भाजपपेक्षा अधिक जागा जिंकून त्यांच्या पक्षाने मोठ्या भावाची भूमिका राखली आहे आणि महापालिकेतला सर्वात मोठा पक्ष म्हणूनही स्थान कायम ठेवले हे खरे आहे; पण एकूण निवडणुकीतील आकडेवारी पाहिली तर खैरे यांनी आनंद साजरा करावा, अशी स्थिती मात्र मुळीच नाही. कारण ९९ सदस्यांच्या मागच्या महापालिकेत शिवसेनेचे ३० नगरसेवक होते. म्हणजे सभागृहातला ३०.३० टक्के हिस्सा शिवसेनेकडे होता.
आज ११३ नगरसेवकांपैकी केवळ २८ म्हणजे २४.७७ टक्के नगरसेवक शिवसेनेचे आहेत. गुलमंडीची जागा ही शिवसेनेसाठी आणि विशेषत: खासदार खैरेंसाठी विशेष प्रतिष्ठेची होती. कधी नव्हे ती पालकमंत्री रामदास कदम यांची जाहीर सभाही या मतदारसंघात घेण्यात आली होती. तरीही त्या जागेवर खासदार खैरे आपल्या पुतण्याला निवडून आणू शकले नाहीत. एमआयएमचे भूत उभे केले, त्याची भीती दाखवली आणि मुंबईहून दबाव आणून भारतीय जनता पक्षाला युती करायला लावली म्हणून निदान घसरण एवढ्यावरच थांबली, अन्यथा शिवसेनेची स्थिती कदाचित यापेक्षाही वाईट राहिली असती.
युती झाली नसती तर भारतीय जनता पक्षाने समांतर पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा हा प्रचाराचा मुख्य मुद्दा केला असता आणि त्या परिस्थितीत शिवसेनेला कदाचित आणखी काही जागा गमवाव्या लागल्या असत्या. ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी होऊ दिले नाही, हे त्यांचे राजकीय कौशल्य म्हणायला हवे. ही निवडणूक धर्माच्या नावावर लढली गेली, विकासाच्या नावावर नाही, असे काही मंडळी ठासून सांगते आहे. ही बाब वस्तुस्थितीपासून दूर नेणारी आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेच्या मुद्द्यावर आणि अानुशंगिक काही प्रश्नांवर विचार करून औरंगाबादकरांनी मतदान केल्यामुळेच शिवसेनेचे संख्याबळ घटले आणि भारतीय जनता पक्षाचे बळ वाढले आहे. ही निवडणूक धर्माच्या आधारे लढली गेली असती तर शिवसेनेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढायला हवे होते.
एमआयएमला मुस्लिमबहुल मतदारसंघात जसा एकतर्फी विजय मिळाला आहे आणि तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे तशीच परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीतही झाली असती तर औरंगाबादकरांनी एमआयएमच्या विरोधात शिवसेनेला मतदान केले, असे म्हणता आले असते. कारण विकासापेक्षा आम्ही धर्माला प्राधान्य देतो, असे त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीच जाहीर केले होते. पण औरंगाबादकरांनी धर्मापेक्षा विकासाला प्राधान्य देऊ, असे म्हणणाऱ्या भाजपला आणि अनेक ठिकाणी बंडखोरांना निवडून दिले आहे.
एमआयएमच्या बाबतीतही पूर्णपणे धर्मावर आधारित मतदान झाले असते तर त्यांच्या उमेदवारीवर पाच बिगरमुस्लिम उमेदवार निवडूनच येऊ शकले नसते. त्यामुळे उगाच औरंगाबादकरांच्या विवेकावर संशय घेण्याचे कारण नाही. वाईट वाटायचेच असेल तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणवणारे हिंदुत्ववादी पक्ष मुस्लिमबहुल मतदारसंघात मत मागायलाच जात नाहीत आणि त्यांच्या तिकिटावर एकही मुस्लिम निवडून आला नाही याचे वाटायला हवे. ही खरी लोकशाही नाही, याचे शल्य बोचायला हवे.
युतीचीच पुन्हा सत्ता आली आहे. मागच्या महापािलकेत सुमारे ३० नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे खऱ्या अर्थाने युतीच्या विरोधातले होते; पण महापालिकेत कधी विरोधी पक्षाचे अस्तित्व जाणवलेच नाही. बहुतेकांनी सत्ताधाऱ्यांशी सूत जमवून आपले हेतू साध्य करून घेतले. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झालाच आणि या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या निम्म्यापेक्षाही अधिक घटली. त्यामुळे या वेळी एमआयएम हा विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत असणार आहे.
आम्ही विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावू, असे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. तीच खरी त्यांच्यासाठी परीक्षा आहे. आमदार म्हणून िनवडून आल्यानंतरच्या सहा महिन्यांत इम्तियाज यांच्याकडे स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या म्हणण्यालाही महापालिकेत काही किंमत असेल. त्या माध्यमातून स्थानिक नागरी समस्या त्यांनी साेडवाव्यात, अशी अपेक्षा मुस्लिमबहुल भागातील नागरिक त्यांच्याकडून करतील. त्यामुळे एक मोठे काम त्यांच्यामागे लागणार आहे.
आमदार इम्तियाज त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात, महापालिकेतील आपल्या नगरसेवकांच्या कामगिरीकडे कसे लक्ष ठेवतात, त्यांच्याकडून प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका कशा प्रकारे निभावून घेतात याकडे साऱ्या शहराचे लक्ष राहणार आहे. ही नवी कामे वाईटपणा घ्यायला लावणारी आहेत. त्यामुळे या तरुण अभ्यासू आमदाराचे राजकीय कौशल्यही यापुढे पणाला लागणार आहे.