आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेतली गती अन् अधोगती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबादचा क्रमांक वर्षभरात ५६ वरून थेट २९९ पर्यंत खाली घसरला. ही बातमी वाचल्यानंतर जे गेल्या दीड, दोन वर्षात औरंगाबाद शहरात आलेले नाहीत त्यांच्या डोळ्यासमोर या शहराचे आणखी किती तरी ‘गलिच्छ’ चित्र नक्कीच उभे राहिले असेल; पण महाराष्ट्रातल्या तमाम पर्यटकांना आणि पाहुण्यांनाही हे आवर्जून सांगितले पाहिजे की गेल्या वर्षभरात या शहराची स्वच्छतेच्या बाबतीतली अवस्था नक्कीच इतकी खालावलेली नाही. उलट काही प्रमाणात सुधारणाच झाली अाहे. हे यासाठी नमूद करावे लागते की, ही पर्यटनाची नगरी अाहे. स्वच्छतेच्या गुणानुक्रमाच्या बातमीने या शहराच्या पर्यटनावर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अर्थात, पर्यटनावर परिणाम होऊ नये म्हणून ही मल्लिनाथी मुळीच नाही. जे डोळे उघडे ठेवून या शहरात फिरतात त्यांच्यापैकी कोणालाही विचारले तरी ती व्यक्ती हेच सांगेल याविषयी शंका नाही. 

परिस्थिती थोडी सुधारली असेल तर या शहराचा क्रमांक इतका खालावला का? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची प्रमुख कारणे बहुतांशी तांत्रिक आहेत. एक तर मागच्या वर्षी ज्यांचे परीक्षण आणि तुलना झाली त्या शहरांची संख्या केवळ ७६ होती. यंदा ती ४३९ वर पोहोचली होती. महापालिकेने तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांतून जे काही दाखवायचे असते त्यासाठी ९०० गुण होते. औरंगाबाद महापालिकेला त्यापैकी शंभर गुणही मिळवता आलेले नाहीत. नागरिकांच्या प्रतिक्रियांवर ६०० गुण अवलंबून होते. त्यापैकी केवळ २६९ गुण महापालिकेला मिळाले. शहरात अनेक ठिकाणी सिमंेटचे रस्ते बनवण्याचे काम सुरू अाहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात धूळ आहे. त्याचा तो परिणाम असावा. या उलट गेल्या वर्ष, दोन वर्षांत या शहरातील ११५ प्रभागांपैकी ५५ प्रभागांमधील कचऱ्याच्या कुंड्या उचलण्यात आल्या असून तिथे आता रस्त्यावर कचरा नसतो. ७२ प्रभागांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे कामही होते आहे. बहुतांश भागात कचरा संकलनासाठी गाडी फिरते आणि रोजच्या रोज कचरा गोळा करून आणते. त्याचा परिणाम शहराच्या अस्वच्छतेत सुधारणा होण्यात नक्कीच झाला आहे आणि हे सारे दृश्य आहे. 

अर्थात, ही काही महानगरपालिकेची वकिली नाही. महापालिकेच्या पदरात तिचे माप टाकण्याशिवाय पर्यायही नाही. घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी महापालिकेची असूनही ती पार पाडली जात नाही. उलट आजूबाजूच्या गावकऱ्यांचा विचार न करता त्यांच्या गावात कचऱ्याचे डोंगर उभे करणे महापालिकेने सुरूच ठेवले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा घेणाऱ्या कंत्राटदारांशी संधान करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न महापालिकेत  अनेकदा झाला. त्यामुळे कंत्राटदार पळून गेले. महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाचा कंत्राटदारांवर अंकुश नाही. त्यामुळे चार रस्ते बनवण्याचे काम गेल्या दीड वर्षापासून रेंगाळते आहे. परिणामी त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ आहे. सफाई कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. कारण बहुतांश कर्मचारी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्याच वशिल्याचे आहेत. सार्वजनिक आणि खासगी शौचालये उभारण्याकडे पालिकेचे लक्ष नाही.  त्यामुळे हागणदारी संपलेली नाही. त्याचा परिणाम गुणांवर नक्कीच झाला आहे. 

दोन वर्षांत १४९ वरून पहिल्या क्रमांकावर गेलेल्या इंदूर महापालिकेच्या कार्य कर्तृत्वाकडे पाहिले तर स्वच्छतेच्या बाबतीत पहिला क्रमांक उगाच मिळू शकत नाही याची खात्री पटते. त्या महापालिकेच्या महापौर मालिनी गौड आणि आयुक्त मनीष सिंह यांनी ठरवून झपाटल्यागत काम केले आणि त्यातून शहर स्वच्छतेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट झाले. स्वच्छता विभागातल्या कामचुकार ५०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणे, १५०० जणांची टीम तयार करून रात्रंदिवस लक्ष ठेवणे, स्वत: महापौरांनी रात्री-बेरात्री बाहेर पडून रस्ते सफाईचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहणे, स्वच्छतेसाठीची संसाधने वाढवणे, रात्रीच्या वेळेचा स्वच्छतेसाठी सदुपयोग करणे, प्राेफेशनल ठेकेदारालाच या कामाचा ठेका देणे, जनतेला विश्वासात घेऊन या अभियानात सहभागी करून घेणे यावर इंदूर शहरात गेल्या अडीच वर्षात भर देण्यात आला होता. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून इंदूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात सर्वोच्च स्थानी जाऊन बसले आहे. यातून केवळ औरंगाबादनेच नाही तर अन्य शहरांनीही प्रेरणा घेण्याची गरज आहे. 

औरंगाबाद शहरात  मात्र यानिमित्ताने एकमेकांना दोष देण्याचे काम सुरू झाले आहे. शिवसेनेने थेट प्रशासनावरच खापर फोडले असून भाजपच्या महापौरांनी प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना ‘मार्गदर्शन’ केले आहे. इंदूरच्या महापौरांप्रमाणे आपणही संकल्प करायला हवा, असे मात्र कोणाला वाटलेले नाही. त्यामुळे आता औरंगाबादकर ठरवतील तरच काही घडण्याची आशा आहे. 
 
-  निवासी संपादक, औरंगाबाद
 
बातम्या आणखी आहेत...