आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Director Dr. Jabbar Patel, Latest News In Divya Marathi

यशवंतरावांचा जीवनपट उलगडण्यास 10 तासही अपुरे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-यशवंतराव हे केवळ महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले राजकारणीच नव्हते तर एक संवेदनशील समाजकारणी, व्यासंगी साहित्यिक आणि पट्टीचे कलारसिक होते. त्यांच्यावरील चित्रपटाला 10 तासांचा अवधीही कमी पडेल. यशवंतरावांचे अनेक प्रसंग चित्रपटात दाखवू शकलो नाही ही खंत आहे. पण चित्रपट ही एक कलाकृती आहे, पाहणार्‍यांचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. पटेल, अभिनेते अशोक लोखंडे यांनी रसिक व पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे, यशवंतराव प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, सुबोध जाधव, चित्रपटाच्या टीमचे जयंत कुंदन आणि मोहन रत्नपारखी यांची उपस्थिती होती. प्रोझोन मॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पटेल यांनी हा चित्रपट बनवताना आलेले अनुभव सांगितले. तसेच आपण मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आळजापूर येथील असल्याचे सांगून सर्वांना सुखद धक्का दिला.
हा चित्रपट हृदयस्पर्शी टप्पा
या वेळी चित्रपटात यशवंतरावांची भूमिका साकारलेले अशोक लोखंडे म्हणाले, मी अनेक मालिकांतून प्रेक्षकांना परिचित आहे, पण चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा पद्धतीने समोर आलो. हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातील हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा टप्पा आहे.
वेणूची भूमिका ताकदीची
तरुण वेणूची भूमिका साकारलेली वैशाली दाभाडे तिच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाली, हा माझा पहिलाच चित्रपट. डॉक्टरांनी माझी ऑडिशनही न घेता मला भूमिका करायला दिली. तरुण वेणूची भूमिका छोटीच असली तरी यशवंतरावांच्या जीवनातील निर्णायक क्षणी धैर्याने सामोरी जात, त्यांना पाठिंबा देणारी पत्नी अतिशय ताकदीने साकारता आली. हे मी करू शकले याचे समाधान आहे.
या चित्रपटात आव्हानात्मक काय?
यशवंतराव हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अडीच तासांमध्ये विविध अंगांनी उलगडणे हे आव्हान होते. पण याशिवाय महाराष्ट्र निर्मितीनंतरचे फुटेज होते, त्याआधी त्यांचे बालपण, तरुणपणातील दृश्ये उभी करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे मत; यशवंतराव चव्हाणांवरील चित्रपटाच्या प्रीमियरप्रसंगी सिनेरसिकांशी साधला संवाद
प्र. निवेदन, शाहिरी आणि स्वकथन अशा तिहेरी बाजूने चित्रपट पुढे सरकत गेला, हे अति वाटले नाही का?
उ. नाही, कारण नाना पाटेकर हे पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापकाच्या भूमिकेतून चित्रपटात यशवंतरावांचे पैलू उलगडतात. तर शाहीर यशवंतरावांच्या पराक्रमाची वर्णने करतो. आत्मकथनात यशवंतराव विविध महत्त्वपूर्ण, निर्णायक प्रसंगांत त्यांच्या मनात येऊन गेलेले विचार बोलून दाखवतात. ते स्वत:च स्वत:ची स्तुती कसे काय करतील? या दृष्टिकोनातून तिघांचे निवेदन सर्मपक आहे. यामध्ये नाटककार ब्रेख्तच्या थेअरीचा वापर करण्यात आला आहे.
प्र. यशवंतरावांच्या प्रवासाचे अनेक टप्पे राहिले?
उ. यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि नंतर या दोन्हींच्या मधले एक विराट पर्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचे व्यक्तिमत्त्व असाधारणरीत्या पुढे आले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची निर्णायक भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती, केंद्रात संरक्षण खाते, अर्थ खाते आणि गृह खाते अशा महत्त्वपूर्ण जागांवर त्यांनी काम केले. ते राजकारणी नेते नव्हते तर तारणहार, संकटमोचकही होते. जेव्हा देश अडचणीत सापडला तेव्हा त्यांनी निर्णायक भूमिका घेतली.