आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अगं बाई अरेच्चा-२'चे 11 वर्षांपासून करतोय प्रमोशन, केदार शिंदे यांच्याशी बातचीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. वैचारिक, तत्त्वनिष्ठ, वास्तववादी आणि संदेशात्मक याही पलीकडे जाऊन चित्रपटाला ग्लॅमर प्राप्त झाला आहे. मराठी चित्रपटाचे प्रमोशन व्यवस्थित होत नाही म्हणून ते चालत नाहीत, अशी विचारधारा होती. गेल्या पाच वर्षांत निर्मितीपेक्षा प्रमोशनला अधिक महत्त्व देण्याचा विचार रुजला आणि त्याला यशही आले. मी मात्र, "अगं बाई अरेच्चा'च्या पाच सिक्वेलच्या स्क्रिप्टची थीम तयार केली. त्यानुसार अकरा वर्षांपूर्वी पहिल्या भागात पार्ट-२ चे प्रमोशन केले. कारण प्रमोशनमधून चित्रपटाचे अर्धेअधिक यश अवलंबून असते, यावर मला विश्वास आहे, असे प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले.
"अगं बाई अरेच्चा-२' चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने शहरात आले असताना "दिव्य मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, मनोमनी, लोच्या झाला रे अशा धमाल विनोदी नाटकांतून आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करणारे लेखक, दिग्दर्शक शिंदे यांनी चित्रपटांच्या विविध पैलूंविषयीचे मत व्यक्त केले.

शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकधारातून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. नाटक लिहिली ती दिग्दर्शितही केली.

त्याला प्रचंड यश मिळाले कारण महाराष्ट्रीय रसिकांची नेमकी नस मला गवसली. भरत जाधव, संजय नार्वेकर अशा रंगभूमी गाजवलेल्या कलावंतांना घेऊन चित्रपटही केले, त्याला यश आले. यंदा कर्तव्य आहे, जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे आणि अगं बाई अरेच्चा चित्रपटांवर प्रेक्षकांनी प्रेम केले. यानिमित्ताने लेखक म्हणून मी सिद्ध झालो, याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. गंगाधर टिपरे मालिकेच्या वेळी दिलीप प्रभावळकर आणि माझे सूर जुळले. पुढे या सुरांतून श्रवणीय संगीत नक्कीच प्रेक्षकांच्या वाट्याला येईल. "अगं बाई अरेच्चा'चे मी सिक्वेल करणार आहे, सर्वांच्याच स्क्रिप्टची थीम तयार आहे. आता सोनाली कुलकर्णीला मुख्य भूमिकेत सादर करतोय. कारण माझ्या चित्रपटाचा हीरो सोनाली आहे. एका सामान्य मुलीभोवती फिरणारी ही कहाणी आहे, असे त्यांनी सांगितले.
फायद्याऐवजी माणसे जपतो
विविधनात्यांतून माझा प्रवास घडत असतो. मला कुठल्या गोष्टीतून फायदा होईल यावर विचार करण्यापेक्षा आयुष्यभर टिकेल असा मित्र कसा मिळेल यावर माझा भर असतो. चित्रपटांच्या माध्यमातून मी मित्र बनवण्याचे माझे मूळ काम जोरात सुरू असते. भरत, संजय, सोनाली, मकरंद असे अनेक मित्र यातूनच तर मला मिळाले आहेत, हीच माझ्या आयुष्याची ठेव आहे.