आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो अंधश्रद्धेला आवर घाला, फँड्री चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आजचा काळ बदलला असून शिक्षणाने समाज शिक्षित होतो आहे. असे असले तरी समाजात छोट्या छोट्या गोष्टीतून अंधश्रद्धा खोलवर रुजवली जाते आहे. अशा प्रकारांना ओळखून आवर घालता आला पाहिजे आणि ही जबाबदारी तरुणांवर अधिक आहे, असे प्रतिपादन "फँड्री'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे औरंगपुरा येथील सीमंत सभागृहात आयोजित राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिग्दर्शक मंजुळे म्हणाले, समाजाची प्रगती होत असल्याचे दिसत असताना बाबाबुवांचे प्रकार सर्रास सुरू आहेत. समाजातील अडचणी, न्युनगंडाचा फायदा हे मंडळी घेत आहेत. ही चिंतेची बाब असून संभ्रमाचा असा हा काळ आहे. बुवाबाजी म्हणजे प्रयत्नवादाला छेद देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी आपण रांगा लावतो आहोत हे ओळखता आले पाहिजे. डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. त्यांचा हा विवेकी विचार घरा-घरापर्यंत पोहंचविण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. आलेल्या संकटावर मात करत, तरुणांनो हा विचार रुजविण्यासाठी निकराने लढा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाच्या प्रमुख अधिकारी वर्षा ठाकूर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे होते. या वेळी व्यासपीठावर शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, शहाजी भोसले, माधव बावगे, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत चाललेले आंदोलन यापुढेही शांततेने चालू ठेवायचे आहे. अंनिसचे कार्य यापुढेही चालू ठेवण्यासाठी युवकांनी पुढे यावे. आपल्या समाजात अंधश्रद्धेव्यतिरिक्तही अनेक समस्या आहेत. पुढील काळात आपला देश महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहे, परंतु महासत्ता होण्यासाठी तरुणांनी विवेकवादी होण्याची गरज असून त्यासाठी तरुणांनी संघटित होऊन विवेकवादाचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शैला दाभोलकर व नागराज मंजुळे यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यकर्ता पुरस्कार चळवळीचे कार्यकर्ते नागेश कुसळे, अहमदनगर व कृष्णा चांदगुडे, नाशिक यांना प्रदान करण्यात आला, तर साथी निळूभाई फुले सांस्कृतिक अभिव्यक्ती प्रेरणा पुरस्कार राजू इनामदार, पुणे यांना प्रदान करण्यात आला.

युवा परिषदेचा पहिला दिवस बीजभाषण, गटचर्चा व ह्यरिंगणह्ण नाटकाने गाजला. विविध कार्यक्रमांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून जवळपास २५० तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला.
युवा परिषदेत आज परिसंवाद
दुसऱ्या दिवशी (रविवारी) ९.३० ते ११ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विवेकी व्यक्तिमत्त्व विकास, चला, व्यसनाला बदनाम करूया ! आणि जोडीदाराची विवेकी निवड अशा विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तरुण संकल्प करणार आहे. कार्यक्रमाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व डॉ. भालचंद्र कांगो यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.