आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकांच्या प्रचाराचा खर्च ३० लाखांपुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नुकत्याचझालेल्या औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही संचालकांचा प्रचार खर्च हा ३० लाखांच्या पुढे गेल्याचे समोर येत आहे. काही संचालकांनी तर मतदारांना प्रत्येकी हजार रुपये मोजल्याचीही चर्चा या वर्तुळात आहे. अपक्ष म्हणून निवडणूक आलेले संचालक तर आकड्यात याही पुढे गेल्याचे सांगण्यात येते.

बाजार समितीसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी निकाल जाहीर झाले. निकालानंतर कोणाला संचालकपद किती रुपयांत पडले, याची चर्चा दिवसभर होती. यात काहींना जास्तीचा खर्च करूनही हाती पराभव पडल्याचे दु:ख होते तर खर्च जास्त झाला तरी संचालक होत असल्याचा आनंद काहींनी व्यक्त केला. लोकसभा, विधानसभा किंवा अन्य निवडणुकीत होत नसेल असा जल्लोष या निवडणुकीच्या निकालानंतर बघण्यास मिळाला. एकूणच ही निवडणूक अत्यंत खर्चिक झाल्याचे सांगण्यात येते. एका संचालकासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च झाला असेल तर १८ संचालकांसाठी किती रुपये खर्च झाला असेल, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे सांगण्यात येते.

गतवेळी ही बाजार समिती भाजपच्या ताब्यात होती. या वेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या गटाचे सदस्य विजयी झाले. अपक्षांच्या मदतीने आता समितीचा ताबा त्यांच्याकडे जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे, परंतु राज्यात सत्तेत असलेला तसेच विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील गट काय करतो, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

सभापती निवडीकडे लक्ष
बाजारसमिती ही खरे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी असते, परंतु या समितीत व्यापाऱ्यांचेच हित जोपासले जाते. येथे व्यापाऱ्यांतून तीन संचालक विजयी झाले असून तेच आता सभापती कोणत्या गटाचा हे ठरवणार आहेत. कारण बागडे असो की डॉ. काळे यांच्यापैकी कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. व्यापारी संचालक ज्या दिशेने जातील त्या दिशेने सत्ता असे समीकरण आहे. त्यामुळे ३० लाखांपर्यंत खर्च करून आलेले संचालक आता सभापतिपदासाठी काय करतात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. पुढील पंधरा दिवसांत सभापती कोण याचेही उत्तर समोर येईल.

व्यापारी ठरवणार सभापती
बाजारसमितीचा सभापती कोण होईल, याचे चित्र अजून अस्पष्ट असले तरी केवळ संचालक होण्यासाठी काही उमेदवारांनी ३० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभापती होण्यासाठी किती रुपयांचा जुगार खेळला जाईल, यावरही आताच तर्क लावले जात आहेत.