आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानक बनले समस्यांचे आगार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सुविधांचा अभाव असल्याने अकोला बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याची असुविधा, स्वच्छतेचा अभाव व पार्किंगवर होत असलेली अरेरावी यामुळे प्रवासी वैतागले आहेत. बसस्थानक समस्यांचे आगार बनले असून, प्रवासी मात्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे बेजार झाले आहेत.
अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरून दैनंदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून बसस्थानक प्रशासनातर्फे आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात दिरंगाई होत आहे. बसस्थानकाच्या छतावर कबुतरांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे बाकड्यांवर नेहमी घाण साचलेली राहते. दिवसभर ही घाण तशीच पडून असल्यानंतरही याची साफसफाई करण्यात दिरंगाई केली जाते. पिण्याच्या पाण्याची सोय बसस्थानकावर करण्यात तर आली आहे, पण पाण्याची टाकीची कित्येक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. त्यामुळे या पाण्याला वास सुटला आहे. कंट्रोल रूममध्ये बसलेले कर्मचारी हे प्रवाशांशी उडवाउडवीची उत्तरे देताना दिसतात. सोमवारी, असा प्रकार दुपारी 12.30 च्या सुमारास घडला. बसस्थानकावर ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढल्याने प्रवासी त्रासून गेले आहेत.
तिकीट दराचा फलक गायब : प्रत्येक बसस्थानकावर तिकीट दराचा फलक लावलेला दिसून येतो. मात्र, अकोला बसस्थानक त्याला अपवाद आहे. प्रशासनाला याचा विसर पडलेला दिसून येतो.
बसस्थानक करते कंपन्यांची जाहिरात
बसस्थानकावरून एसटी महामंडळाचे कमी अन् कंपन्यांच्या जाहिरातीचे फलक लावलेले दिसतात. एसटीच्या महत्त्वपूर्ण फलकावर या जाहिराती लावण्यात आल्याने प्रवाशांना माहिती दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे बसस्थानक प्रशासनाने खासगी कंपन्यांची जाहिरात करण्याचा ठेका घेतला की काय, असे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळते.
पार्किंगवरही अरेरावी
अकोला रेल्वेस्थानकावरील पार्किंग सुविधा गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने बसस्थानकावरील पार्किंगशिवाय प्रवाशांना पर्याय उरला नाही. त्यामुळे हीच बाब हेरून बसस्थानकावरील पार्किंगचे कामगार प्रवाशांसोबत उद्धटपणे वागताना दिसतात. मात्र, याकडेसुद्धा आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे.
केवळ एक पंखा बंद
बसस्थानक ही सार्वजनिक जागा आहे. साफसफाई केली जाते. साफसफाईचा कंत्राट दिला आहे. प्रवासी या ठिकाणी स्वच्छता ठेवत नाहीत. केवळ एक पंखा बंद आहे.''
ए. एम. शेंडे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक, अकोला.