आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात ऋषितुल्य गुरूला शिष्याची खुलेआम शिवीगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन वर्षांपासून एमफिल करणाऱ्या एका विद्यार्थ्याने ऋषितुल्य ज्येष्ठ प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. श्रीराम निकम यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (२३ जून) घडली. प्रकाश इंगळे असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुणवत्ता डावलून दोघांना एमफिलसाठी प्रवेश देण्याची मागणी घेऊन तो डॉ. निकम यांच्याकडे आला होता. त्यांनी मात्र गुणवत्ता यादीत खाडाखोड करणार नसल्याचे निक्षून सांगितल्यामुळे इंगळेने सर्वांसमक्ष गुरूचीच अवहेलना केली.
प्रकाश इंगळे याची एमफिल डॉ. निकम यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तीन सेमिस्टरचा म्हणजेच १८ महिन्यांचा हा अभ्यासक्रम जास्तीत जास्त २४ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अभिप्रेत आहे. इंगळेची मात्र तीन वर्षे उलटूनही त्याने संशोधनकार्य सुरू केले नसल्याचे डॉ. निकम यांनी म्हटले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाशी संलग्नित असलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा प्रकाश इंगळे हा जिल्हाध्यक्ष आहे. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्राध्यापक त्याच्या उद्धट वर्तनाला कंटाळल्याचे डॉ. निकम यांनी म्हटले आहे. सीईटी आणि गुणवत्ता यादीनुसार २० जणांची एमफिल प्रवेशाची यादी डॉ. निकम यांनी नुकतीच विभागात प्रसिद्ध केली. ‘पण त्या यादीत दोन विद्यार्थ्यांना घ्या. ते आपल्या संघटनेचे कार्यकर्ते असून त्यांना अतिरिक्त कोट्यातून प्रवेश द्या,’ असा अनाठायी हट्ट इंगळेने केला. त्यावर, मी नियमबाह्य कामे कधीही करत नाही. त्यामुळे गुणवत्ता यादीत कुठलीही खाडाखोड करणार नसल्याचे डॉ. निकम यांनी त्याला निक्षून सांगितले. म्हणून इंगळेने आपल्या गुरूलाच अश्लील शिवीगाळ केली. मानव्य विद्याशाखेच्या इमारतीत सायंकाळी शिष्य आपल्या गुरूला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत असताना सर्वच प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी पाहत होते. डॉ. निकम यांच्या मते, इंगळेमध्ये ज्ञानाची पातळी अजिबातच नसल्यामुळे त्याचे संशोधनकार्य पुढे सरकले नाही. त्याच्याविरोधात आपण कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि कुलसचिव दिलीप भरड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, तर आपण स्वत: बेगमपुरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे डॉ. निकम यांनी म्हटले आहे. कुलगुरूंना तक्रारीची प्रत मिळाली असून त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांत तक्रार देण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती आहे. दरम्यान, इंगळेची प्रतिक्रिया घेण्यासाठी मोबाइलवर चार वेळा संपर्क साधला असता त्याने फोन रिसिव्ह केला नसल्यामुळे त्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

संशोधनकार्य नाहीच
^कुलगुरूंचे आमचे संबंध चांगले आहेत. आता त्यांच्याकडून एमफिलचे प्रवेश करून घेतो आणि तुमची सोयदेखील पाहतो, अशी धमकी त्याने दिली. यूजीसीला थापा मारून त्याने फेलोशिप घेतली आहे. वास्तविक पाहता त्याने संशोधनकार्य काहीच केलेले नाही -डॉ. श्रीराम निकम, विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
बातम्या आणखी आहेत...