आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या राजकारणाचा पुनर्उदय म्हणजे ‘आप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शंभर वर्षांपूर्वी विदेशातून आल्यानंतर महात्मा गांधींना अपेक्षित काँग्रेस म्हणजेच आम आदमी पार्टी आहे. गांधींनी जहाल टिळक आणि मवाळ गोखले यांचे राजकारण संपवले, तसेच काहीसे काँग्रेस व भाजपच्या बाबतीत आप करेल. हा गांधींच्या राजकारणाचा पुनर्उदय आहे, असा दावा राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे यांनी केला.

परिवर्तन संस्थेच्या वतीने गोविंदभाई स्मृती सभागृहात ‘आप राजनैतिक पर्याय की नुसताच आभास?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुनील दाते होते.

प्रा. डोळे म्हणाले, 1915 मध्ये गांधी देशात आले तेव्हा त्यांच्यासोबत डावे अन् उजवेही होते. त्यांना टोकाचा विरोध होता तसाच टोकाचा पाठिंबाही होता. तरीही गांधी हे टिळक, गोखले यांचे राजकारण संपवण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्य हा एकमेव अजेंडा त्यांनी यशस्वी केला. असेच आताचे चित्र आहे. अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव ही मंडळी खादी वापरत नाहीत, पांढरे कपडे घालत नसले तरी त्यांच्यावर गांधी विचाराची छाप आहे. गांधींना अपेक्षित काँग्रेस यानिमित्ताने प्रत्यक्षात येऊ शकते.

डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, आपची सध्या पक्षनिर्मिती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या पक्षावर आताच भाष्य करणे घाईचे ठरले. पण डावे पक्ष नेहमीच मित्रांची संख्या वाढवण्यास उत्सुक असतात. आम्ही आपला मित्र करण्यास तयार आहोत, पण ते आम्हाला मित्र समजतात की नाही, हे सांगता येत नाही. त्यांनी जशी भ्रष्टाचार्‍यांची यादी जाहीर केली तशी प्रामाणिकांचीही यादी जाहीर करून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, असे जाहीर करावे, असे आवाहन केले. डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले, आपला चांगली प्रसिद्धी मिळत असली तरी काँग्रेस आणि भाजप त्यांचे मनसुबे उधळून लावतील. आपची चळवळ ही भावनेवर आधारलेली आहे, रचनात्मक नाही. त्यामुळे ती यशस्वी होईल की नाही, अशी शंका असली तरी त्याला यश मिळावे.

रमेश खंडागळे म्हणाले, आपने विविध प्रश्नांवर आपली भूमिका जाहीर केलेली नाही. ग्रामसभेला अधिकार दिल्यानंतर पुन्हा दलितांवर अन्याय वाढतील. त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाईल, हेही त्यांनी स्पष्ट केले नाही.

यापूर्वी राजकारणात झालेल्या अनेक प्रयोगांपेक्षा हा प्रयोग वेगळा आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर समाजातील सर्व घटकांच्या समस्यांना आपने स्पर्श केला आहे. त्यामुळे यश नक्की मिळेल, नवी क्रांती करण्यात या पक्षाला यश येईल, असा दावा या पक्षात प्रवेश केलेले सुभाष लोमटे यांनी केला.