वाळूज- मागील काही महिन्यांपासून नवीन वस्त्यांमधून सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीमुळे तरुण व्यसनाधीन होत असून अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे ही छुपी दारू विक्री तत्काळ थांबवण्यात यावी, नसता जोगेश्वरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम अधीक्षक कार्यालयास शनिवारी निवेदनाद्वारे दिला आहे.
जोगेश्वरी ही ग्रुप ग्रामपंचायत असून तिने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रमात आयएसओ नामांकन मिळविले आहे. लोकसहभागातून ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत गाव व्यसनमुक्ती करण्याचेही उद्दिष्ट ग्रामपंचायतीने समोर ठेवले आहे. या उद्दिष्टाअंतर्गत गावालगतच्या शासकीय गायरान जागेवर (गट क्र.१४) अतिक्रमण करून २००४ पासून देशी दारूचे दुकान थाटलेले होते. या दुकानामुळे अनेक तरुण मुले, कामगार वर्ग व्यसनाधीन होत होता. त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत होते. त्यामुळे या देशी दारूच्या दुकानाबाबत महिला ग्रामस्थांनी १ ऑक्टोबर २०१३ रोजी ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी महिलांच्या रेट्यापुढे ग्रामपंचायत प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत जेसीबी यंत्राने सदरील दुकान जमीनदोस्त केले होते. त्यानंतर सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांवर पोलिसात गुन्हेही नोंदविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हे दारूचे दुकान बंद करण्यात ग्रामपंचायतीला यश आले, परंतु आता नव्याने बसलेल्या काही वसाहतींमधून खुलेआम दारू विक्री होत आहे. या संदर्भात महिला ग्रामस्थांनी ग्रामपंचायत गाठून शुक्रवारी सरपंच दळवी यांना घेराव घातला होता.
उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार : महिला ग्रामस्थांनी सरपंच दळवी व इतर ग्रामस्थांना घेराव घातल्यानंतर अवैध सुरू असलेली देशी दारूची विक्री थांबविण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांना ही दारू विक्री थांबविण्याची कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले. ही दारू विक्री बंद न केल्यास पूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे आदींनाही दिल्या आहेत. उपसरपंच नजीर खा पठाण, प्रकाश वाघचौरे, तुकाराम मिठे, संजय दुबिले, हरिभाऊ काजळे, कल्याण साबळे, सुरेश सरोदे, चांगदेव गुळे, राजेंद्र ित्रभुवन, रामचंद्र पाटील यांची या वेळी उपस्थिती होती.
व्यसनमुक्त गावाचा वसा
गावाने व्यसनमुक्तीचा वसा घेतला आहे. त्यासाठीच्या उपाययोजना सुरू आहेत. या सर्व कामात महिलांचा विशेष पुढाकार आहे. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनही कामाला लागले आहे. यातही आम्ही यशस्वी होऊ.
योगेश दळवी, सरपंच, जोगेश्वरी