आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारानंतर बेवारस असलेल्या रुग्णांना सोडायचे तरी कुठे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटीमध्ये बेवारस रुग्णांचा प्रश्न गंभीर बनत आहे. महिन्याकाठी अशा दहा रुग्णांना पोलिस आणि समाजसेवक विविध उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करतात. मात्र, उपचार पूर्ण झाल्यानंतर जे रुग्ण चालण्याच्या स्थितीत नसतात अशांना सोडायचे कुठे, हा गहन प्रश्न घाटी रुग्णालयासमोर उभा राहतो. परिणामी अशा रुग्णांना डिस्चार्ज झालेला असला तरीही काही काळ घाटीमध्येच ठेवावे लागते.
घाटी रुग्णालयामध्ये महिन्याकाठी दहा बेवारस रुग्ण येतात. काहींना पोलिस आणून सोडतात, काहींना समाजसेवक सोडतात. यात भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. काही मनोरुग्णांना तर चक्क त्यांचेच कुटुंबीय आणूस सोडतात अन् घराचा पत्ता वगैरे सांगता चूपचाप निघून जातात. या दहा रुग्णांपैकी सरासरी दोन ते तीन रुग्ण असे असतात, जे डिस्चार्जनंतरही चालण्याच्या स्थितीत नसतात. त्यांना घरचा पत्ता माहिती नसतो. ते स्वत:ची सुश्रूषा स्वत: करू शकत नाहीत.

सोडायचे कुठे?
उपचारासाठी कुणीतरी अपघात विभागात अशा रुग्णांना आणून सोडतात. घाटीमध्ये आठ सामाजिक अधीक्षक कार्यरत आहेत. बेवारस रुग्णांचा केसपेपर तयार करणे, त्यांना संबंधित वॉर्डमध्ये पोहोचवणे, काही तपासण्या करायच्या असतील तर त्या तपासणी कक्षाकडे नेणे-आणणे. इतकेच नव्हे तर त्यांना जेवण देणे आणि औषधी आणून देण्याचे कामही हे सामाजिक अधीक्षक करतात. एकदा त्यांच्यावर उपचार झाले की रुग्णालयात ठेवता येत नाही. पण या रुग्णांपैकी काही रुग्णांची अवस्था खूपच वाईट असते. काहींना स्वत:च्या पायांवर चालता येत नाही. काहींना आपण कुठे राहत होतो त्या जागेचा पत्ताही सांगता येत नाही. काही रुग्ण हे पूर्णपणे मनोरुग्ण असतात. त्यांना तर स्वत:चा पत्ता दूर स्वत:चे नावही सांगता येत नाही. या सर्वांना त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यावर डॉक्टर डिस्चार्ज देतात. मात्र, डिस्चार्जनंतर या रुग्णांना बाहेर सोडायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी काही रुग्णांना सहा-सहा महिन्यांपर्यंत घाटीमध्येच ठेवावे लागते.

केस स्टडी एक
रेल्वेच्या धडकेने एका मनोरुग्णाचा पाय तुटला. त्याला पोलिसांनी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात आणून भरती केले. सध्याही तो येथेच अॅडमिट आहे. त्याच्यावरील उपचार आता संपत आहेत. त्याला त्याचे नाव तसेच पत्ता वा अन्य माहिती काहीही सांगता येत नाही. त्यातच या रुग्णाचा एक पाय तुटल्याने त्याला चालताही येणार नाही. जर डिस्चार्ज झाला तर त्याला कुठे सोडणार?

केसस्टडी दोन
जळगाव जिल्ह्यातील एका ६० वर्षीय रुग्णाच्या पायाला जखम झालेली आहे. त्याला अज्ञात व्यक्तीने अपघात विभागात आणून सोडले. त्याला मूलबाळ नाही. पण आता या रुग्णावर उपचार पूर्ण झाले असून त्याला डिस्चार्जही दिला अाहे. मात्र, त्याला सोडावे कुठे, हा प्रश्नच आहे. डिस्चार्जनंतरही दोन आठवड्यांपासून तो घाटीतच पडून आहे.

राज्यामध्ये १९५९ मध्ये भिक्षा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कुठल्याही कारणाने भीक मागत असलेली व्यक्ती भिकारी या कक्षेत मोडते. अशा व्यक्तींना पोलिसांमार्फत पकडून न्यायालयाच्या आदेशाने खास भिकाऱ्यांसाठी असलेल्या सुधारगृहामध्ये दोन ते तीन वर्षे ठेवण्याची तरतूद आहे. सुधारगृहामध्ये निवास, भोजन, वैद्यकीय सेवा आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे, मुंबई, सोलापूर आणि रायगड हे चार जिल्हे वगळता राज्यात इतरत्र कुठेच असे सुधारगृह नाही. हे सुधारगृह जर औरंगाबादमध्ये असते तर भिकारी रुग्णांना तिथे ठेवता आले असते. तसेच सध्या घाटी रुग्णालयाच्या आवारामध्ये जवळपास ५० भिकारी असतात. त्यांनाही तिथे ठेवता आले असते.

सुस्थितीतील रुग्णांसाठी काही सामाजिक संस्था
ज्या रुग्णांना घरदार नसते, त्यांचा सांभाळ करणारे कुणी नसते, पण ते स्वत:ची सुश्रूषा स्वत: करण्यास समर्थ असतात अशा रुग्णांना शहरातील काही सामाजिक संस्थांमध्ये दाखल केले जाते. या बेवारस रुग्णांचे योग्य संगोपन व्हावे त्यांना आधार मिळावा म्हणून घाटी रुग्णालयातील सामाजिक अधीक्षक त्यांना या संस्थांपर्यंत पोहोचवतात.

आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो
बेवारस रुग्णांवरउपचार केल्यानंतरही ज्यांना चालता येत नाही, घराचा पत्ता माहिती नाही अशा रुग्णांना नेमके सोडावे तरी कुठे, हा प्रश्नच असतो. जे धडधाकट असतात, पण त्यांना सांभाळणारे कुणी नाही अशांना शहरातील काही सामाजिक संस्थांमध्ये दाखल केले जाते. -डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

भिकाऱ्यांसाठी सुधारगृह आवश्यक
भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार सुधारगृह असल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. केवळ घाटी रुग्णालयातील रुग्णांचाच नव्हे, तर शहरात चौकाचौकात थांबणाऱ्या भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचा हा प्रश्न आहे. शासनाने औरंगाबादेत सुधारगृहाची निर्मिती केली पाहिजे. -अॅड. महेश भोसले, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...