आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या न्यायमूर्तींमुळे विमानतळावर डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद विमानतळावर देशी-विदेशी पर्यटक येतात. तेथेच जवळच्या पर्यटनस्थळांची माहिती मागतात. मात्र, राज्याच्या पर्यटन राजधानीच्या विमानतळावर पर्यटनाची माहिती देणारे परिपूर्ण दालन नसल्याने पर्यटकांचा हिरमोड व्हायचा. केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमुळे विमानतळावरील ही गैरसोय समोर आली आणि महाराष्ट्र विकास महामंडळाला येथे पर्यटनस्थळांच्या प्रचारासाठी जागा मिळाली. तेथे आता पर्यटनाचा आकर्षक डिजिटल डिस्प्ले विमानातून बाहेर पडताच पर्यटकांना आकर्षित करणार आहे.
वेरूळ, अजिंठा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. त्यांच्या सोयीसाठी विमानतळावर एमटीडीसीचे एक छोटेसे काउंटर होते. मात्र, येथे पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त नव्हता. दालन छोटे असल्याने प्रवाशांच्या नजरेतही भरत नव्हते. गेल्या महिन्यात केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शहरात आले होते. त्यांनी येथील काउंटरवर पर्यटनस्थळांची माहितीपत्रके मागितली. मात्र, त्या वेळी येथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. योगायोगाने त्या वेळी विमानपत्तन निदेशक आलोक वार्ष्णेय विमानतळाच्या नियमित राउंडवर होते. त्यांना न्यायमूर्तींची अडचण लक्षात आली. त्यांनी लगेच एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना फोन करून कर्मचाऱ्याला बोलावले. १५ मिनिटांत कर्मचारी पोहोचला आणि त्याने आवश्यक ती माहितीपत्रके न्यायमूर्तींना दिली.

दालन खुलून दिसेल
पर्यटकांना पर्यटनासंबंधी माहिती देण्यासाठी अद्ययावत दालनाची गरज होती. मी पुढाकार घेतला आणि लगेच एमटीडीसीला ५० चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली. आलिशान विमानतळावर हे दालन खुलून दिसेल. -आलोक वार्ष्णेय, विमानपत्तन निदेशक

एमटीडीसीचे आलिशान दालन
या प्रसंगामुळे वार्ष्णेय यांना विमानतळावर एमटीडीसीचे अधिक मोठे आणि कायमस्वरूपी काउंटर गरजेचे वाटले. त्यांनी लगेच एमटीडीसीचे वरिष्ठ विभागीय अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना संपर्क केला. शिंदे यांनी प्रस्ताव वार्ष्णेय यांच्याकडे सादर केला. पर्यटनवाढीच्या दृष्टीने निदेशकांनी ५० चौरस मीटरची जागा मंजूर करत त्याचे कामही सुरू करण्याची परवानगी दिली.
बातम्या आणखी आहेत...