आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dispute On Water In Between Western Maharashtra And Marathwada Region

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हक्काच्या पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राविरोधात काँग्रेसच्या नेत्यांचा एल्गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सरकार आपले असले म्हणून काय झाले? त्यांची धरणे भरली आहेत अन् आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पश्चिम महाराष्ट्रातून हक्काचे पाणी मिळत नसेल तर त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. येत्या काही दिवसांत जायकवाडी धरणात वरून पाणी आले नाही तर त्यासाठी लढा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा खोसरे, आमदार एम. एम. शेख, माजी आमदार नितीन पाटील आदी उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील मुद्दे संपल्यानंतर कार्यकर्त्यांना सूचना मांडण्याची वेळ देण्यात आली तेव्हा स्वपक्षावर टीका करण्याबरोबरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हक्काच्या पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील स्वपक्षीयांविरोधात लढण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरल्यानंतरही मराठवाड्याला पाणी सोडण्यात येत नाही. हा प्रकार चुकीचा असून त्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगून याची सुरुवात काँग्रेसने आपल्या जिल्ह्यात मोर्चा काढून करावी, अशी सूचना एकाने केली. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याशी आधी चर्चा करून नंतर थेट आंदोलन सुरू करावे, असे सुचवले.

कोकणपट्टय़ातील 20 हजार टीएमसी पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी मराठवाड्याकडे वळवल्यास या भागाची गरिबी दूर होणार आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. सदस्यांनी सादर केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येत असून त्यानुसार पुढील बैठकीपूर्वी कारवाई केली जाईल, असे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी जाहीर केले.

कार्यकर्त्यांनी सुचवलेले प्रस्ताव
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी काँग्रेसने आक्रमक आंदोलन करावे.
तेथे आपलेच आमदार असले तरी पाण्यासाठी मोर्चा काढावा.
पालकमंत्र्यांना सूचना नव्हे, तंबी द्यावी.
कोकणपट्टीतून समुद्रात वाहून जाणारे 20 हजार टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवावे.