आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disputes Between Ramdas Kadam And Chandrakant Khaire

विकास आराखड्यावरील ‘अर्था’मुळे चिघळला वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम खा. चंद्रकांत खैरे यांनी संक्रांतीच्या मुहूर्तावर एकमेकांना तिळगूळ देऊन घेतलेली गळाभेट ताजी असतानाच विकास आराखड्यावरून त्यांच्यात ठिणगी उडाल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विकास आराखड्यात मोठा ‘अर्थ’ असताना महापौरांनी सर्वसाधारण सभेत काय करायचे ठरले याची माहिती पालकमंत्र्यांनाच दिल्याने खैरे चवताळल्याचे समोर आले आहे.
वर्षभरात खैरे यांची सद्दी कमी होत गेली. कदम यांनी शिवसेनेतील खैरेविरोधकांच्या मनातील खदखद हेरत मनपा निवडणुकीपासून खैरे यांची कोंडी करत आणली. आता खैरेंची मनपातील शक्ती क्षीण होत असतानाच त्यांनी धार्मिक स्थळांचे अतिक्रमण आता विकास आराखड्याचा विषय हाताळणे सुरू केले.

आराखड्याच्या बाबतीत नागरिकांमधील असंतोषाचा वापर करून मनपा पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याची खैरे यांची चाल पालकमंत्री मनपा पदाधिकाऱ्यांनी काल हाणून पाडल्याचे चित्र आहे. काल सर्वसाधारण सभेच्या आधी घडलेले टीकानाट्य समोर आले. मनपा सभागृहात नगरसेविकांना निवेदनांची भली थोरली फाइल घेऊन पाठवल्याचे त्यावरून घडलेले नाट्य सर्वांसमोर आले. पण पडद्याआड बऱ्याच गोष्टी घडल्या. ‘दिव्य मराठी’ने याचा शोध घेतला असता कदम विरुद्ध खैरे संघर्ष पार मातोश्रीपर्यंत गेल्याचे समोर आले.

महापौर त्र्यंबक तुपे यांनी विकास आराखड्याबाबत काय ठरले आहे सर्वसाधारण सभेत काय करायचे आहे याची माहिती काल पालकमंत्र्यांच्या कानावर टाकली होती. पालकमंत्र्यांनी महापौरांशी बोलून सारे निश्चित केले. तिकडे खैरे विकास आराखड्याबाबत अतिउत्सुक होते. मात्र, आपल्याला सभेचे ब्रिफिंग होत नाही हे लक्षात आल्यावर दुपारी मेळाव्यात खैरेंनी महापौरांवर तोफ डागली. सभागृहात सभागृह नेते महापौरांनी खैरेंकडून आलेले निवेदन घेण्यास नकार दिला. त्याही आधी खैरे यांच्याकडून महापौरांना सतत निरोप येत होते. माझ्याशी आधी बोला, सर्वसाधारण सभा थांबवा, असे निरोप पोहोचवले गेले. सभा सुरू असतानाच हे सारे नाट्य घडल्याने अखेर वैतागलेले महापौर उठून गेले त्यांनी पालकमंत्र्यांच्या कानी सारा प्रकार टाकला. दरम्यान, खैरे यांना रस असणाऱ्या विषयात पालकमंत्र्यांनी उडी घेत शेवटी त्या निवेदनांना सभागृहात सादर होऊच दिले नाही. तिकडे कदम खैरे या दोघांनीही झाला प्रकार मातोश्रीवर कळवत वाद मुख्यालयात नेला.

गोडवा कमी झाल्याची चर्चा
या विषयावरून खैरे कदम पुन्हा पहिल्यासारखेच आमने-सामने आल्याने तिळगुळाचा गोडवा कमी झाल्याची चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे. कालच्या कार्यक्रमात मनपा पदाधिकाऱ्यांबाबत खैरेंनी काढलेल्या उद्गारांबाबत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ही बाब मुंबईतील वरिष्ठांच्याही नजरेला आणून दिली.