आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे ठरवून खच्चीकरण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिका निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरवून खच्चीकरण चालवल्याचे समोर येत आहे. या खच्चीकरणामुळे राष्ट्रवादीचा तोटा झाला हे खरे असले तरी त्यामुळे काँग्रेसचेही नुकसान झाले आहे. निवडणुकीत एकत्र लढले असते तर त्यांच्या नगरसेवकांची संख्या नक्कीच वाढली असती. त्याचबरोबर आता एकत्र येऊन गट स्थापन केला असता तर एक स्वीकृत सदस्य वाट्याला आला असता स्थायी समितीमध्ये पहिल्या वर्षी दोन नंतरच्या वर्षात एक सदस्य पाठवता आला असता. पण भांडणात दोघांचेही नुकसान झाले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर पालिका निवडणुकीत ती होईल, असे संकेत होते. परंतु काँग्रेसने राष्ट्रवादीला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवले. राष्ट्रवादीचे कसेबसे तीन नगरसेवक विजयी झाले. कोणत्याही अटीविना राष्ट्रवादीने महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारासाठी बोट वर केले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा गट असेल, असे सर्वांनीच गृहीत धरले होते. परंतु गट नोंदणीची मुदत संपण्यास अवघे २० मिनिटे बाकी असताना काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अक्षरश: पिटाळून लावले.
एकत्र आले असते तर...
सार्वत्रिक निवडणुकीत एकत्र आले असते तर आताची नगरसेवक संख्या (१३) किमान दुप्पट होऊ शकली असती. गट नोंदणीत एकत्र आले असते तर अन्य अपक्षांना सोबत घेता आले असते. सदस्यसंख्या १६ च्या आसपास असली असती. मोठा गट असल्याने एक स्वीकृत सदस्य देता आला असता. स्थायी समितीवर पहिल्या वर्षी किमान दोन अन् नंतरचे चार वर्षे प्रत्येकी एक सदस्य पाठवता आला असता. आता स्वीकृत सदस्य असणार नाही. पहिल्या वर्षी काँग्रेसचा एक सदस्य स्थायी समितीत जाईल, नंतरचे चार वर्षे मात्र ही संधी मिळण्याची शक्यता नाही.
आघाडी करताना पुन्हा चकवा
महापौर निवडणुकीत एकत्र आल्याने काही अपक्षांना सोबतीला घेऊन दोन्ही पक्षांची आघाडी होईल, असे सर्वांनीच गृहीत धरले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही तशीच अपेक्षा होती. शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीची मुदत होती. दुपारपासून सुभेदारीवर बैठक सुरू होती. सायंकाळी पाच वाजता नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र सादर करायचे होते. वाजून ४० मिनिटांनी काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नकार दिला, पण त्याअाधी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक पळाला. त्यामुळे अन्य दोन नगरसेवकांसह अपक्षांच्या आघाडीत जाण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली.
काँग्रेसला केली मदत
आघाडी झाली नसली तरी महापौर उपमहापौर निवडणुकीत कोणत्याही अटीविना राष्ट्रवादीने काँग्रेसला मदत केली. बदल्यात उपमहापौरपदाची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे दोन्ही पक्षांची पुन्हा आघाडी होईल एकच गट असेल, असे चित्र निर्माण झाले होते.
आघाडी करताना काय घडले?
आघाडी होणार असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. जागा वाटपाची लवकरच बैठक होईल, असे वेळोवेळी सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली तरी ती बैठक काही झाली नाही. राष्ट्रवादीकडून विचारणा होत होती. परंतु काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही उलट त्यांचे उमेदवार ठरवले. त्यामुळे राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी मिळेल त्याला उमेदवारी द्यावी लागली.
बातम्या आणखी आहेत...