आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझे माझे जमेना... मनपात महापौर-उपमहापौरांची जमलेली जोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापौर उपमहापौर ही दोन्हीही पदे एकाच पक्षाची असे चित्र महानगरपालिकेत एक अपवाद वगळला तर पुन्हा दिसले नाही, तरीही या दोन पदांवरील मंडळींनी एकत्रित काम केले. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी या पदांवरील व्यक्तींची जोडी जमल्याचे वेळोवेळी दिसून आले. कोणताही कार्यक्रम असला तरी दोन्हीही पदांवरील व्यक्ती सोबतच दिसून आल्या, परंतु सध्याचे महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यात हा सदाचार दिसून येत नाही.
त्यामुळे प्रथमच महापौर उपमहापौरांची जमलेली जोडी, असे त्यांच्याविषयी बोलले जाते.
शहराचे पहिले महापौर डॉ. शांताराम काळे यांच्या काळात उपमहापौर त्यांच्याच पक्षाचे होते. त्यानंतर मात्र महापौर सेनेचा, तर उपमहापौर भाजपचा. महापौर भाजपचा, तर उपमहापौर सेनेचा. कधी शिवशक्तीच्या मदतीला धावणाऱ्या भीमशक्तीलाही उपमहापौरपद मिळाले. त्यामुळे या दोन्हीही पदांवरील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांच्याच होत्या, तरीही त्यांच्यात सख्य होते.

केंद्रात राज्यात भाजप हा मोठा पक्ष या नात्याने पुढे आला. मनपातही त्यांना तेच अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. ओघानेच महापौरपद सेनेकडे गेले. पण समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पावरून या दोन्ही पक्षांत पडलेली वादाची ठिणगी शमली नाही.
बैठक घेण्यावरही बंदी : महापौर तसेच स्थायी समितीचे सभापती यांना अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे संवैधानिक अधिकार आहेत, परंतु कोणताही अधिकार नसताना उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता तसेच गटनेतेही बैठका घेतात.

याला चाप लावण्यासाठी महापौर तुपे यांनी आयुक्तांना पत्र देऊन बैठक कोण घेऊ शकतो, अशी विचारणा केली. त्यात फक्त दोघांचीच नावे समोर आली. महापौरांचे हे पत्र उपमहापौरांच्या बैठकांना चाप लावण्यासाठी होते, अशी चर्चा होती. दुसरीकडे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांचा सुसाट सुटलेला वारू थांबवण्यासाठी तुपे यांनी हा फंडा वापरल्याचे बोलले जाते.
का दिसतो फरक?
पूर्वीबहुतांश कार्यक्रमांना महापौर उपमहापौर सोबतच असत, परंतु या काळात तसे घडत नाही. महापौर कोठे जातात याची कल्पना उपमहापौरांना नसते, तर उपमहापौरांनी कोणाची बैठक बोलावली, कोणाची भेट घेतली याची कल्पना महापौरांना नसते. समांतर तसेच वेगवेगळ्या प्रकरणांवरून ही मंडळी एकमेकांवर टीका करतात.
आमची जोडी विभक्त नाही
- काही विषय पक्षाचे असतात, त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. काही विषयांत आदेशानुसार उपमहापौरांना दूर ठेवावे लागले. अन्यथा आमची जोडी विभक्त असण्याचा काहीही प्रश्न नाही.
त्र्यंबक तुपे, महापौर
विकासकामांबाबत आमचे एकमत
- आम्ही एकत्रच आहोत. युतीतील वादामुळे आम्ही एकत्र दिसतो की नाही याची चर्चा होत असावी. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही नाही. विकासकामांच्या बाबतीत आमचे एकमत आहे. वाद काही नाही.
प्रमोद राठोड, उपमहापौर.