औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील यांचाच ताबा असल्याचे गुरुवारी मतमोजणीतून स्पष्ट झाले. सदस्य बिनविरोध झाले होते. ते पाटील यांच्याच गटाचे होते. १५ जागांसाठी मतदान झाले. त्यातील १३ जण पाटील यांच्या गटाचे असून एक बंडखोरही त्यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे पाटील यांचे या बँकेवर निर्विवाद वर्चस्व असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
स्वत: पाटील, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे हे बिगरशेती मतदारसंघातून एकतर्फी विजयी झाले. कन्नड फुलंब्री येथील दोन जागा या गटाला राखता आल्या नसल्या तरी फुलंब्रीतून विजयी झालेले पुंडलिक जंगले हे पाटील यांच्यासमवतेच जाणार असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. पुढील पंधरा दिवसांत बँकेच्या अध्यक्षांची निवड होणार असून यात सुरेश पाटील यांचेच नाव आघाडीवर आहे. अध्यक्षाची निवडणूक कधी घ्यायची हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात येणार असून पंधरा दिवसांत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.
१९५७ ला पहिली निवडणूक
याजिल्हा बँकेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९१७ ला झाली. त्यानंतर पहिली निवडणूक १९५७ मध्ये झाली. पहिल्यापासूनच या बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. बँकेच्या शहरात १७, तर ग्रामीण भागात ४५ शाखा आहेत.
क्रमांक एकची बँक
औरंगाबादची जिल्हा बँक ही मराठवाड्यातील क्रमांक एकची बँक ठरली आहे. कोअर बँकिंग, एसएमएस सेवा, एटीएम यातही या बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेकडे ९०८ कोटी रुपयांच्या ठेवी असून अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. सर्व खर्च वजा जाता ही बँक वर्षाला ५० कोटींच्या पुढे नफ्यात आहे.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य : जावेद पटेल, बाबूराव पवार, अंकुश रंघे, नंदकुमार गांधिले संदिपान भुमरे.
बिगरशेती मतदारसंघ (कंसात त्यांना मिळालेली मते) : अब्दुलसत्तार (२८३), अभिजित देशमुख (२८७), दामोदर नवपुते (२८३), सुरेश पाटील (३०८) हरिभाऊ बागडे (२९५)
पणनसंस्था मतदारसंघ : नितीन पाटील (३७) त्यांच्याविरोधात असलेले महेश देशमुख यांना मते
महिला राखीव : वर्षाजगन्नाथ काळे (७९२) मंदाबाई माने (७५७)
एससी, एसटी मतदारसंघ : दशरथ गायकवाड (७५८)
वैजापूर मतदारसंघ : रामकृष्ण बाबा पाटील (८१) येथे ज्ञानेश्वर जगताप यांना ३० मते मिळाली.
खुलताबाद मतदारसंघ : किरण अशोक पाटील (११), विरोधक ज्ञानेश्वर दुसारे यांना मते मिळाली.
कन्नड मतदारसंघ : अशोक सर्जेराव मगर (४९), पाटील गटाचे नारायण जाधव हे एका मताने पराभूत. जाधव यांना ४८ मते मिळाली.
फुलंब्री मतदारसंघ : पुंडलिक साहेबराव जंगले (२९), पाटील गटाचे जितेंद्र जैस्वाल यांना २८ मते मिळाली. ते एका मताने पराभूत झाले.
सिल्लोड मतदारसंघ : प्रभाकर पालोदकर (४६), जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोटे यांना ३७ मते मिळाली.
सोयगाव मतदारसंघ : रंगनाथ काळे (१९), त्यांचे विरोधक प्रभाकर काळे यांना १६ मते मिळाली.