औरंगाबाद- जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र होळकर यांची हत्या त्यांच्याच पत्नीने घडवली असल्याचे उघड झाले आहे. पती संशय घेत असल्याने सुपारी देऊन तिने हा खून घडवून आणला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नीसह 4 आरोपींना अटक केली आहे. घरात घुसून होळकर यांची हत्या करण्यात आली होती. मारेकर्याने होळकर यांचे दोन्ही हात दोरीने बांधून त्यांचा गळा चिरला. सातारा परिसरातील छत्रपती नगरात ही धक्कादायक घटना शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री होळकरने (वय 38) पतीला मारण्यासाठी किरण गणोरे, फैय्याज आणि बाबू यांना 2 लाखांची सुपारी दिली होती. किरण गणोरेने सुपारी देण्यासाठी मध्यस्थी केली, तर फैय्याज आणि बाबू यांनी जितेंद्र होळकर यांचा खून केला. गणोरे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
खून करण्यासाठी दिली 2 लाखांची सुपारी
गेल्या दीड महिन्यापासून हा खून करण्यासाठी प्लॅनिंग सुरू होते. होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर हिने 2 लाख रुपये देऊन खून करण्याचा डाव रचला. ठरल्याप्रमाणे 10 हजार रुपये आधी देऊन हा खून करवून घेण्यात आला. खुनानंतर उर्वरित एक लाख 90 हजार देण्याचे ठरले होते. तत्पूर्वीच खून करणाऱ्या दोघांना आणि मध्यस्थाला अटक करण्यात आली. त्यानंतर कांबी येथून खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक करण्यात आली. या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला.
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी या घटनेचा तपास केला. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत सांगितले की खून झालेले जितेंद्र होळकर हे पैठण तालुक्यातील शेकटा गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती. त्यांची पत्नी आरोपी भाग्यश्री ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यालय प्रमुख आहे. त्यांना लग्नानंतर एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांचा मुलगा यश हा 9 वीत आहे. जितेंद्र आणि भाग्यश्री यांनी अनेक वर्षे सुखाचा संसार केला मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात भांडणे होत होती. जितेंद्र हा भाग्यश्रीला मारहाणही करत होता.
गणोरेकडे मागितली मदत
तिची ओळख गणोरे बरोबर झाल्यावर त्याने तिला मदत मागितली होती. तिने त्याला 4 महिन्यापूर्वी 10 हजार रुपये देऊन दिले. त्यानंतर त्याने या खूनासाठी मारेकरींचा शोध सुरु केला. त्यात त्याला तौसिफ शेख हा बेरोजगार युवक सापडला. तो 2 लाखात हे कृत्य करण्यास तयार झाला. तौसिफने शेख हुसैन यालाही या कटात सामील करुन घेतला. त्यानंतर या चौघांनी प्लॅनिंग केले.
भाग्यश्रीनेच उघडला घराचा दरवाजा
शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास तौसीफ आणि शेख होळकर यांच्या घरासमोर पोहचले. ते आल्याचे लक्षात आल्यावर भाग्यश्रीने दरवाजा उघडला. त्यानंतर कोणतीही शंका येऊ नये यासाठी त्यांनी भाग्यश्रीला एका खोलीत कोंडले. त्यानंतर त्यांनी होळकर यांचा खून केला आणि ते तेथून निघून गेले.
स्पोर्ट्स बाइक झाला मोठा पुरावा
पोलिसांनी घटनेनंतर या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात त्यांना 2 युवक स्पोर्ट्स बाइकवरुन जाताना दिसले.
पोलिसांनी या भागातील जुने सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्यात 5 दिवसांपूर्वी ही बाईक होळकर यांच्या घरासमोर उभी असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी या गाडीचा नंबर तपासला. तपासात हा नंबर गणोरेच्या बाईकचा असल्याचे समोर आले.
- त्यानंतर पोलिसांनी गणोरेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. या चौकशीत गणोरेने सुरुवातीला दाद दिली नाही पण नंतर त्याने सगळे सांगितले. त्यानंतर भाग्यश्री, तौसिफ आणि शेख यांना अटक करण्यात आली.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती