आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात जिल्हा बँकेवर दरोडा, २० लाख लंपास; गॅस कटरने खिडकी तोडून प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - मोंढा मार्केट परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत रविवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी तिजोरी फोडून २० लाखांची रोकड पळवली. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस सुट्या आल्याने बँक बंद असल्याचे हेरून दरोडेखोरांनी ही संधी साधली.

शाखा व्यवस्थापक किरण भाटिया व रोखपाल हे सोमवारी सकाळी रोकड काढण्यासाठी गेले असता त्यांना तिजोरी फुटलेली दिसली. तिजोरीतील २० लाख रुपये गायब असल्याचे आढळले. भाटिया यांनी घटना कळवताच पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन पथकासह बँकेत आले. दरोडेखोरांनी मागील बाजूची खिडकी गॅस कटरने तोडून बँकेत प्रवेश केला होता. कॅशियरच्या केबिनजवळील तिजोरी ठेवलेल्या कक्षाचे लोखंडी गेट गॅस कटरने तोडले आणि तिजोरीही कटरने फोडून २० लाखांची रोकड पळवली, हे स्पष्ट झाले. दोन दिवस सुट्यांमुळे बँक बंद असल्याचे हेरून दरोडेखोरांनी डाव साधला. भाटिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीच नाही
बँकेच्या १४७ शाखांत सीसीटीव्ही यंत्रणा तसेच सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर आले. वैजापूर पोलिसांनी महिनाभरापूर्वीच बँकेला सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना केली होती. पण बँकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी सांगितले.