आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन जिल्हा-शहराध्यक्ष लवकरच, पण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा,विधानसभा तसेच महानगरपालिकेतील दारुण पराभवानंतर लगेचच काँग्रेसची जिल्हा शहर कार्यकारिणी बदलली जाणार होती. नोव्हेंबरपासून नवीन पदाधिकाऱ्यांचे वेध लागले होते. परंतु फेब्रुवारी संपत असतानाही कार्यकारिणी अस्तित्वात येऊ शकली नाही. याचे उत्तर अजून कोणीही देऊ शकलेले नाहीत. नवीन पदाधिकाऱ्यांचे काय होणार हे कोणालाही माहिती नाही. नवीन पदाधिकारी लवकरच ठरतील, पण कधी? हे मात्र सांगता येत नसल्याचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीही मान्य केले.
अडीच-तीन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला चांगली लढत देता यावी यासाठी संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याचे संकेत देण्यात आले होते. परंतु औरंगाबाद जिल्हा शहराची भौगोलिक तसेच सामाजिक परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस श्रेष्ठीलाही तातडीने निर्णय घेणे शक्य झाले नाही. अब्दुल सत्तार यांच्या रूपाने जिल्ह्यात एकमेव काँग्रेस आमदार विजयी झाला. त्यामुळे सत्तार यांची जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. त्यास प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही मूक संमती दिली होती. परंतु यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद हे मुस्लिम कार्यकर्त्याकडे आहे. एमआयएमचा शहरात दणक्यात झालेला प्रवेश लक्षात घेता शहरात मुस्लिम तरुणाकडेच काँग्रेसचे नेतृत्व असावे, असा मतप्रवाह आहे. शहराध्यक्षपद मुस्लिम कार्यकर्त्याकडे दिले जाते तेव्हा जिल्ह्याचे नेतृत्व मराठा कार्यकर्त्याकडे देण्याचा शिरस्ता येथे आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी लवकरच निर्णय घेऊ, असे तीन महिन्यांपूर्वी औरंगाबाद मुक्कामी सांगितले होते. मात्र, पुढे काहीही होऊ शकले नाही. परिणामी केशवराव औताडे यांच्याकडे जिल्ह्याची, तर अॅड. सय्यद अक्रम यांच्याकडे शहराची धुरा अजूनही कायम आहे. दोघांचाही कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक झाला आहे.

अनेक दिवसांपासून संघटनेत कोणतेही बदल होत नसल्याने नवीन पदाधिकारी कधी, असा प्रश्न संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांकडे उपस्थित केला जातो. पण त्याचे उत्तर कोणाकडेही नाही.

कधी ते सांगता येत नाही
^आमच्या पक्षात सर्वांगीण निर्णय घेतला होता. प्रदेश पातळीवर त्याची प्रक्रिया सुरू आहे. पण नेमके केव्हा हा निर्णय होईल, हे सांगता येत नाही. लवकरच पदाधिकारी नियुक्त केले जातील, परंतु कधी ते मात्र सांगता येत नाही. सचिन सावंत, प्रदेशसरचिटणीस.

जिल्ह्याचे नेतृत्व सक्षमपणे पुढे नेणारा चेहरा नेतृत्वाला दिसत नसल्यामुळे आ. सत्तार यांचे नाव पुढे आले होते. मात्र, सत्तार यांच्याकडे जिल्ह्याची धुरा दिली तर शहराचे नेतृत्व मराठा कार्यकर्त्याकडे द्यावे लागेल, असे अनेकांनी खासगीत सांगितले. यामुळे जिल्हा कार्यकारिणी निश्चिती पुढे ढकलण्यात आली आहे.