आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काहीही करून जिल्हा परिषदेचा आखाडा आम्ही लढवणारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हापरिषदेच्या ६२ गट पंचायत समितीच्या २० गणांच्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना फटका बसला. तरीही काहीही करून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे. यासाठी आजूबाजूच्या गटात संधी उपलब्ध असल्याने ते चाचपणी करीत असून काही सभापतींनी तर गटही निश्चित केले आहेत. ज्यांना पर्यायच नाही, अशांनी घरातील महिलेला निवडणुकीत उतरवण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
जि. प. अध्यक्षपद गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीने जि. प. निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. उपाध्यक्ष दिनकर पवार यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. यामुळे त्यांच्या पत्नी किंवा घरातील महिलेला उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण सभापती विनोद तांबे यांचा गट महिलेसाठी राखीव असल्याने त्यांनी पाचोडमधून निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित केले आहे. मनाजी मिसाळ यांनी घायगाव गटातून तर दीपक राजपूत यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पती-पत्नी दोघेही निवडणूक लढवू शकतात, अशा गटांचीही दिग्गज सदस्यांकडून चाचपणी केली जात आहे.

नवीन खेळाडूही मैदानात
गतनिवडणुकीत जिल्हा परिषदेत ६० पैकी काँग्रेस १४, राष्ट्रवादी ११, मनसे ०८ अशा ३३ जागा मिळवून सत्ता संपादन केली. २७ सदस्यांसह शिवसेना-भाजप विरोधी बाकावर आहेत. राज्यात भाजप-शिवसेना तर देशात भाजपची सत्ता आहे. याचा आगामी निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी आतापासूनच डावपेच सुरू झाले आहेत. काहीही करून पर्यटननगरीच्या मिनी मंत्रालयावर सत्ता मिळवायचीच, यासाठी प्लॅन आखला जात आहे. दिग्गज सदस्यांना आपापल्या गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गत निवडणुकीत भाजप-सेनेच्या उमेदवारांना पराभूत करणाऱ्यांचे गट आरक्षणामुळे हिरावले गेले आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठीही डावपेच आखले जात आहेत. दुसरीकडे, सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर असणार आहे. डावी आघाडी, नवीन संभाजी ब्रिगेड, छावा आणि अपक्षही या वेळी आपले बळ अाजमावण्याची चिन्हे आहेत.

मनसेचे बळ वाढीचे प्रयत्न
सध्या जिल्हा परिषदेत मनसेचे सदस्य आहेत. सत्ता स्थापनेत त्यांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका ठरली. त्यांना अर्थ बांधकाम सभापतिपद मिळाले. पण मनसेला विधानसभेत सपाटून मार खावा लागला. राज्यातील स्थान अस्थिर आहे. सदस्यसंख्या पुरेशी नसल्याने चिन्ह हिरावले गेले आहे. अशा बिकट अवस्थेत पक्षात राहावयाचे की नाही, या मन:स्थितीत अनेक सदस्य असून त्यांनी उमेदवारी मिळेल भविष्यात फायदा होईल, अशा पक्षात जागा शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, मनसेचे संख्याबळ वाढवण्यासाठीही प्रयत्न होत आहेत.

सोशल मीडिया हायटेक तंत्रज्ञानाचा वापर
माझी जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लढण्याची तयारी पूर्ण झाली होती. पण दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत झाली. वेरूळ गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. त्यामुळे मला आता या गटातून निवडणूक लढवता येणार नाही. पण घरातील कुणाला तरी (महिलेला) निवडणूक लढवायला लावायची, असे माझे मत आहे, किंवा मी गदाना गटातून निवडणूक लढवावी असे वाटते. आपण माझ्या मताशी सहमत असाल तर सांगा, असा संदेश जि. प. सदस्य शैलेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी व्हॉट्सअॅपवर टाकून मतदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे मेसेज, व्हॉइस मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हायटेक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...