आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटी, उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटींचा प्रस्ताव पाठवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील साडेसहा हजार रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने हवी तेवढी कामे होत नाहीत. तातडीची कामे करण्यासाठी बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते खराब झाले असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करून काही पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे निदर्शनास आणून दिले. हे रस्ते कधी दुरुस्त करणार अशी विचारणाही त्यांनी केली.
यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी काही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. त्यासाठी दोन कोटी ६८ लाख रुपयांचा निधी लागणार अाहे. इतका निधी जिल्हा परिषदेकडे नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्तावही दोन्ही कार्यालयांना पाठवला असल्याचे सांगितले. यावर महिनाभरात मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या रस्त्यांची कामे झाल्यानंतर उर्वरित रस्त्यांची कामे करण्यासाठी २८ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचे बाविस्कर यांनी स्पष्ट केले.

स्थायीच्या बैठकीत धार्मिक स्थळांची यादी रद्द करण्यावरही जोरदार चर्चा झाली. भाजपचे सदस्य अनिल चोरडिया यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २३ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन धार्मिक स्थळांची यादी आणि सर्वेक्षण चुकीचे असल्याचे िनदर्शनास आणून दिले, अशी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सर्वेक्षण करून यादी तयार करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहितीही चोरडिया यांनी दिली.

बैठकीत अन्य योजनांवरही चर्चा झाली. शिवाय सर्वच गावातील नागरिकांना सरसकट शौचालयांचा लाभ देऊन कुणालाही वंचित ठेवू नये, अशी मागणी रामदास पालोदकर, अॅड. मनोहर गवई यांनी केली. त्यावर सदस्यांच्या भावना शासनाला कळवू, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी स्पष्ट केले.

उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा
गंगापूर तालुक्यातील उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याने कामे प्रलंबित राहत असल्याचे बांधकाम सभापती संतोष जाधव गवई यांनी सांगितले. त्यावर सर्व सदस्यांनी प्रत्येक तालुक्यातच असा प्रकार होत असल्याचे सांगितले. त्यावर कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी या अभियंत्यांना नोटिसा देऊन समज देऊ, असे स्पष्टीकरण दिले. तसेच जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या आदेशानुसार सर्वांची आढावा बैठकही घेण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.