आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council Women Of 2 Million Work Canceled

जि.प. सभा - महिला कडाडताच 2 कोटींची कामे रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-गाळ काढण्यासाठी शासनाकडून आलेला दोन कोटींचा निधी केवळ 17 सदस्यांच्या गटांत वाटप केल्यामुळे महिला सदस्या आक्रमक झाल्या. त्यांनी प्रशासनास गाळ काढण्याचे काम रद्द करण्यास भाग पाडले. या मुद्दय़ावरून अर्धा तास सभागृहात गोंधळ उडाला. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच महिलांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पुरुष सदस्यदेखील अवाक् झाले.

जिल्हा परिषद अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी एक वाजता तहकूब झालेली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत दुष्काळी भागात गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी र्मजीतील सदस्यांच्या गटांस देण्यात आला होता. नियमाप्रमाणे निधीचे वाटप झाले नाही, शासनाने मोजक्याच सदस्यांच्या गटात निधी वाटपाची परवानगी दिली होती का, असा प्रश्न पुष्पा जाधव, शोभा नलावडे, सुरेखा जाधव, नंदा काळे यांनी उपस्थित केला. प्रशासनाच्या निर्देशानुसारच कामे वाटप केल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट करताच या महिला सदस्यांनी एकच आवाज उठवला. निधी वाटपाच्या यादीचे वाचन करण्यात यावे, असा आग्रह या सदस्यांनी धरला. महिला सदस्यांना अंधारात ठेवून पुरुष सदस्य मलाई वाटून घेतात. आज मात्र तसे होणार नाही. आम्ही केवळ नाष्टा करण्यासाठी येत नाही. आमच्या गटासही निधी द्या, अशी आक्रमक भूमिका घेत या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी कामे रद्द केल्याची घोषणा केली. येणार्‍या तीन कोटींच्या निधीमधून कामाचे समान वाटप करण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगताच प्रकरणावर पडदा पडला.

शाब्दिक चकमक!


निधीच्या मुद्दय़ावरून सभागृह सचिव छायादेवी शिसोदे, विनोद तांबे यांच्यासोबत पुष्पा जाधव यांची शाब्दिक चकमक उडाली.


तांबेंचा विनोद


जिल्हा परिषदेला प्राप्त निधीच्या संदर्भात वर्तमानपत्रांनी दिलेल्या बर्‍या-वाईट बातम्यांमुळे मिळणार्‍या तीन कोटींच्या निधीत अडथळा निर्माण झाला असल्याचा जावईशोध काँग्रेसचे गटनेते विनोद तांबे यांनी लावून सभागृहात चांगलाच ‘विनोद’ केला.