आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनकराच्या साथीने आघाडीला पावला श्रीराम, जि. प. अध्यक्षपदी महाजन, उपाध्यक्षपदी दिनकर पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी दुपारी ३.३० वाजता पार पडली. आघाडीने सत्ता कायम ठेवली असून अध्यक्षपदी काँग्रेसचे श्रीराम महाजन, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर पवार निवडून आले. त्यांनी अनुक्रमे शिवसेनेचे अनिल चोरडिया व इंदू वाघ यांचा नऊ मतांनी पराभव केला. आघाडीच्या उमेदवारांना ३४, तर युतीच्या उमेदवारांना २५ मते पडली.
जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. ११ ते एक नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ होती. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून भराडी, ता. सिल्लोड गटातील श्रीराम महाजन, तर शिवसेनेकडून वडगाव कोल्हाटी गटाचे अनिल चोरडिया यांनी अर्ज भरले. उपाध्यक्षपदासाठी पालोद, ता. सिल्लोड गटाचे राष्ट्रवादीचे प्रभाकर पालोदकर; बोरसर, ता. वैजापूर गटाचे दिनकर पवार, भाजपकडून वडोद बाजार गटाच्या इंदू वाघ यांनी अर्ज भरले होते. पालोदकर यांनी अर्ज परत घेतला. त्यामुळे उपाध्यक्षपदाची लढत वाघ व पवार यांच्यात झाली.
यात वाघ यांना २५, तर पवार यांना ३४ मते पडली. अध्यक्षपदाच्या निवडीतही महाजन यांना ३४, तर चोरडिया यांना २५ मते पडली. हात उंचावून ही निवडणूक घेण्यात आली. यात पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराची घोषणा केली. त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी सहायक म्हणून काम पाहिले. निवडीनंतर महाजन यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांच्या दालनापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

युतीचा चमत्कार नाही
शनिवारपर्यंत मनसेचे गटनेते शैलेश क्षीरसागर यांनी मनसे युतीसोबत जाणार असल्याचे सांगितले होते. तशी बोलणीही युतीसोबत सुरू होती. मात्र, ऐनवेळेला मनसेच्या सदस्यांनी आघाडीला मतदान केले. त्यामुळे युतीच्या वतीने करण्यात येणारा चमत्कार झालाच नाही.

जिल्हाधिका-यांना त्रास
पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रम कुमार होते. मुख्यालयात आल्यानंतर आघाडीच्या सदस्यांची ट्रॅव्हल्स आणि कार्यकर्ते मुख्य इमारती बाहेर जमले होते. त्यामुळे विक्रम कुमार यांची गाडी आणण्यास अडचण आली. त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांना खडसावले. आपल्याला जमत नसल्यास कमिश्नरला सांगतो, असेही ते म्हणाले. त्यानंतर कोळेकर यांनी मुख्यालयातून सर्व कार्यकर्त्यांना गेटच्या बाहेर घातले.