आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनकवडेंच्या कारनाम्यांची जंत्री सचिवांकडे रवाना, आदेशानंतर जिल्हा परिषद कारवाई करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद.- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांना शिक्षिकेमार्फत लाच घेताना शुक्रवारी (१९ सप्टेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली होती. शनिवारी जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी सायंकाळी कार्यालयात पदभार स्वीकारला होता. यामुळे सर्वच जण संभ्रमात पडले. सोनकवडेंवर कोणतीच कारवाई प्रशासनाने केली नसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, ज्या दिवशी त्यांनी पुन्हा पदभार घेतला त्याच दिवशी त्यांच्या कारनाम्यांची जंत्री जिल्हा परिषदेने समाजकल्याण सचिवांकडे सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
लाच प्रकरणात अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जयश्री सोनकवडे यांची सुटका झाली होती. सोनकवडे यांनी सुटका होताच पुन्हा मुख्यालयात येऊन कामकाज पाहिले. त्यांच्यावर प्रशासनाने थेट कोणतीही कारवाई केली नाही. सोनकवडे वर्ग एकच्या अधिकारी असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नाही. मात्र, त्यांच्या कारनाम्यांचा अहवाल आणि कारवाई प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव ते समाजकल्याण सचिवांकडे पाठवू शकतात. त्यानुसार शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत समाजकल्याण सचिवांकडे असा अहवाल पाठवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला अवाहलही मागवण्यात आला होता. हा अहवाल आहे तसाच ठेवून त्यात जामिनावर मुक्त झाल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला पुन्हा पदभार घेता येतो का, हे योग्य की अयोग्य, त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे, असे पुरवणीपत्रही त्यासोबत पाठवण्यात आले आहे.
अहवाल पाठवला
समाजकल्याण सचिवांना जयश्री सोनकवडे यांच्याबाबत अहवाल पाठवण्यात आला आहे. सचिवांकडून आदेश आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. सचिवांच्या आदेशाची प्रतीक्षा संपल्यावर कारवाई केली जाईल.
दीपक चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.