आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद सभापती निवडीत मनसेचे पारडे जड, चव्हाण यांना समाजकल्याण सभापतिपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीची निवडणूक बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यात मनसेचे पारडे जड झाले असून मनसेला दोन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर दहा दिवसांनंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. यात मनसेच्या सहलीवरील पाच सदस्यांपैकी दोन जणांना सभापतिपद मिळाले आहे.
निवडणुकीतील मनसेच्या शेवटच्या डावाचे खेळाडू संतोष जाधव यांना बांधकाम व अर्थ समिती सभापतिपद, तर शीला चव्हाण यांना समाजकल्याण सभापतिपद मिळाले. काँग्रेसचे विनोद तांबे यांना आरोग्य व शिक्षण समिती सभापतिपद मिळाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरला मनगटे यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपद मिळाले. सुरुवातीला समाजकल्याण सभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. यात तीन अर्जांपैकी रामनाथ चोरमले यांनी अर्ज परत घेतला. शीला चव्हाण आणि बहुले योगिता यांच्यात लढत झाली. चव्हाण यांना 34 तर बहुले यांना 25 मते मिळाली. यात नऊ मतांनी चव्हाण विजयी झाल्या. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सुरेखा जाधव यांनी अर्ज परत घेतला. त्यामुळे पल्लवी तुपे व सरला मनगटे यांच्यात लढत झाली. तुपे यांना 26 तर मनगटे यांना 33 मते पडली. दोन विषय समित्यांच्या निवडीसाठी आठ उमेदवारांनी अर्ज केले होते. पैकी संतोष माने, दीपाली काळे, मनाजी मिसाळ, सुदाम मोकासे यांनी अर्ज परत घेतले. उर्वरित चार सदस्यांत लढत झाली. यात संतोष जाधव यांना 35 मते मिळाली. शैलेश क्षीरसागर यांना शून्य मते मिळाली. दुसऱ्या समितीसाठी विनोद तांबे व हरिकिशन सुलताने यांच्यात लढत झाली. तांबे यांना 33, तर सुलताने यांना 26 मते पडली. यात जाधव व तांबे हे विजयी झाले. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटक, सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी काम पाहिले. तसेच एम. सी. राठोड, राजेंद्र चव्हाण, एम. पी. पडलवार, श्रीकांत देशपांडे, श्याम भाले, सरताज सय्यद, संजय कळम यांनी काम पाहिले.